मीडियातलं #Me Too

रावणा पासून एम जे अकबर पर्यंत किंवा दुर्योधन-दुःशासना पासून रंगीला रतन, तरुण तेजपाल पर्यंत किती पुरुषांनी महिलांवर त्यांच्या इच्छे विरोधात लैंगिक दुराचार केले असतील ? अनेक जण हे सगळीकडेच चालतं त्यात काय नवीन ? इतक्या बेजबाबदारपणेही बोलतात.मीडियातल्याच एका बहाद्दराने चक्क लोकमान्य टिळकाचंच उदाहरण दिलं ." टिळकांवरही ताई महाराजांनी बलात्काराचा आरोप केला होता'हे त्याचं वाक्य ! काही जण यात महिलांनीच चूक मानतात.तर काही जणांचे मत चक्क 'सापडला तो चोर,बाकीचे साव : म्हणजे थोडक्यात इथे कोणीही पुरुष धुतलेला तांदूळ नसतो' इतके टोकाचे असते.यात काही सन्मानीय अपवाद वगळता ; असा पळवाटीचा रस्ता ठेवायला हरकत नाही,परंतु एका महिलेने सांगितलेले एक वाक्य सांगतो.'जसे की सर्वच साप विषारी नसतात तसेच पुरुषांचीही आहे,पण प्रत्येक सापाची जशी भीतीच वाटते तशीच प्रत्येक पुरुषांचीही वाटते.साप विषारी आहे की नाही हे दंश झाल्यानंतरच्या परिणामांवर ठरते.मात्र दंश तर होतोच.ती नैसर्गिक प्रवृत्तीच आहे सापाची.म्हणजेच जे बिनविषारीपणाची 'कात'पांघरतात ते ही दंश करू शकतात.म्हणजे करणारच नाहीत याची शाश्वती नाही.थोडक्यात इथे सगळे असलेच तर संधी अभावी चारित्र्य संपन्न असतात.
हे प्रिडिक्शन आहे एका महिलेचे.सुशिक्षित,स्वावलंबी,मुक्त विचाराच्या आणि आधुनिक महिलेचे .त्यांची अधिक ओळख इथे देण्याचे औचित्य नाही,परंतु त्यांनी व्यक्त केलेले मत महत्वाचे आहे.कारण त्या कधीकाळी पत्रकार देखील होत्या,काही काळ प्रशासकीय अधिकारी होत्या,कार्पोरेट क्षेत्रात देखील होत्या, आणि आता एका राजकीय पक्षाच्या माध्यम विभागात काम करतात.थोडक्यात त्यांनी विविध क्षेत्रातले मी टू चे अंडरवर्ल्ड पहिलेले आहे.मी त्यांना विचारलं,तुम्हाला काही वाईट अनुभव आले का ? त्याचं उत्तर त्यांनी होय असं दिलं,परंतु मी त्याची बळी ठरले नाही,कारण मी कुणा समोर कधीच हतबल आणि कुणावर कधीच अवलंबून कधीच राहत नाही.विसंबून राहत नाही .जे काही पद,संधी,सन्मान,अधिकार,पदोन्नती,वेतनमान मिळवायचे ते गुणवत्ता आणि मेहनतीने,स्वबळावर,दुसरा मार्ग अजमावायचाच नाही.स्त्री असल्याचा गैरफायदा सोडाच फायदा देखील घ्यायचा नाही.ही खरी समानता आहे.ती कसोशीने पाळली की कोणीही पुरुष आपल्या दिशेने सरकण्याचा प्रयत्न करत नाही.या उप्पर कोणी उपटसूंभ केलाच तर कोणतीही किंमत मोजण्याची तयारी ठेवून कानाखाली ठेवून द्यायची आणि सरळ कायदा दाखवायचा.हे सगळ्याच मुली महिलांना शक्य होत नाही,हे खरं आहे.म्हणूनच बोक्यांचं फावतं असे त्या महिलेने म्हटले.
हा सगळा संदर्भ या करीता दिला की काळ परवा पर्यंत सिनेमा कार्पोरेट क्रीडा राजकारण अशा क्षेत्रात घोंगावणारं वादळ मीडियाच्या उंबरठ्याला येऊन धडकलंय.एम जे अकबर यांच्या रूपात.अर्थात ते काही आता पत्रकार राहिलेले नाहीत.पण त्यांचे मूळ पत्रकारितेत आहे.आणि त्यांनी त्या काळी उधळलेले गुण आता प्रकाशात येत आहेत.याचा अर्थ अमेरिका खंडाचा शोध लागलाय असे नव्हे.तो आधीच होता, कोलंबसचं गलबत त्याच्या किनाऱ्याला येऊन लागलं आणि तो पाण्यात लपलेला भूखंड उघडकीस आला.पत्रकारितेच्या समुद्रात अकबरा सारखी आणखी किती 'बेटे'असतील.एका तरुण तेजपाल महाशयांची कर्म कहाणी सगळ्यांना माहिती आहे,ती खरी की खोटी,माहित नाही.कदाचित हनी ट्रॅपही असेल.किंवा तरुण तेजपाल वरून तहलका आणि आतून हलकट ही असेल.( विषारी आणि बिनविषारी साप ओळखायचा कसा ? ) कधी कधी महिलांकडून जवळीकही साधली जाते.कामा पुरता मामा बनवले जाते,गरज सरो वैद्य मरो केले जाते.किंवा कल्टी मारण्यासाठी कांगावा केला जातो.कधी सुडापोटी,कधी आकसापोटी,कधी सुपारी घेऊन,कधी ब्लॅक मेलिंग म्हणूनही आरोप होतात.नाही असे नाही.परंतु हे प्रमाण नगण्य आणि अपवादात्मक आहे.किमान पुरुषाइतके सार्वत्रिक नाही.मराठी पत्रकारितेत कोणातरी 'रंगीला रतन'ची भलतीच चर्चा रंगते.तास मी पत्रकारितेत येऊनच उणीपुरी साडेचार वर्षे झाली आहेत,त्यापूर्वी वर्तमानपत्राचा आणि माझा संबंध फक्त वाचण्यापुरता होता.पेपरमध्ये आलो आणि पाच सहा महिन्यात कार्यकरी संपादक झालो.पेपर छोटा आहे पण टिकून आहे.पण खरंच सांगतो माध्यमातील बरेच किंबहुना बहुतेक जण मला थेट ओळखत नाही आणि मीही फारसा कुणाला थेट ओळखत नाही.नुसती नावं ऐकून आहे .रंगीला रतन ही काय भानगड आहे,मला खरंच माहिती नाही,तो बाई आहे की बाप्या हे ही मी काल परवा पर्यंत जाणत नव्हतो.परंतु चुकून काल माझा हात काल प्रवीण बर्दापूरकरांच्या ब्लॉगवर पडला आणि तीथे रंगीला रतनचं 'जेंडर'कळलं.भलताच डेंजर आहे हा रंगीला रतन.प्रवीण बर्दापूरकरांच्या 'चपराक मोहिमेत' रंगीला रतनचं 'मिटू'झालं की नाही माहित नाही.पण बर्दापूरकरांनी त्यांच्या ब्लॉग मध्ये उल्लेखित केलेले किस्से एकंदर प्रिंट मीडियातही महिला शोषणाचं बेशरम बऱ्यापैकी फोफावलेलं आहे हे लक्षात आलं.भक्ती चपळगावकर सारख्या नव्या पिढीच्या पत्रकार महिलेने त्या बाबत जे भाष्य केले त्याचाही उल्लेख बर्दापूरकरांनी केला.त्यांनी ज्या घटना सांगितल्या त्यातील दोषी आणि पीडितांच्या नावांचा उल्लेख त्यांनी केला नाही ते योग्यच पण एका नासक्या कांद्याला त्याने कुठल्याच चाळीत घुसू दिले नाही या बाबतची त्यांची 'दक्ष'ता मला विशेष वाटली.मला पत्रकारांच्या क्षेत्रातले राजकारण माहिती नाही.म्हणजे मी कुणाचा गुरुही नाही आणि चेलाही नाही.कुणाच्या गटातटाचाही नाही.या क्षेत्रात आलो तसा एकाच ठिकाणी एकाच स्थानी बसलेलो आहे.त्यामुळे माध्यमजगतातील अंतर्गत गोटात काय खलबते चालतात ती मला कळत नाहीत .त्यात रसही नाही,एक मात्र खरे की माध्यम जगतही या प्रकारापासून सुटलेले नाही .बरेच काही सत्य दडलेले असू शकते.प्रवीण बर्दापूर यांनी थोडा टवका काढला त्यातून आलेला दुर्गंध आत खोल किती घाण आहे याचा अंदाज देत आहे. 
-रवींद्र तहकिक 
कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र