ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या लढ्याला यश : संजय भोकरे

 मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान ही पेन्शन योजना वय वर्ष 60 पूर्ण केलेल्या अधिस्वीकृती पत्रिकाधारक ज्येष्ठ पत्रकारांना लागू करण्यात आली आहे. या योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांना मासिक दहा हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळणार आहे, अशी माहिती राज्य संघटक संजय भोकरे यांनी दिली.
 
राज्य अधिस्वीकृती समितीचे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे,  मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्‍वास आरोटे, संतोष मानूरकर यांच्यासह विविध संघटना आणि पत्रकार पदाधिकार्‍यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन ही योजना मंजूर करुन घेतल्याबद्दल राज्यातील पत्रकारांच्या वतीने सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेला 2 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय क्र. मावज-2013/ प्र.क्र.195/ का.34 अन्वये राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. या पेन्शन योजनेसाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या विश्‍वस्त मंडळामार्फत ही योजना आता राज्यात राबवली जाणार आहे. ज्या पत्रकारांनी तीस वर्ष पत्रकार म्हणून काम केलेले आहे. अथवा वयाची 60 वर्ष पूर्ण झालेले आहे अशा ज्येष्ठ पत्रकार, संपादक, छायाचित्रकार, स्वतंत्र व्यवसायी पत्रकार यांना शासनाच्या नियम आणि निकषानुसार आता निवृत्ती वेतन मिळणार आहे. सरकारने ज्येष्ठ पत्रकारांसाठी सन्मानपूर्वक पेन्शन योजना लागू केली याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर पत्रकारांच्या या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी पत्रकारांची बाजू कणखरपणे मांडणार्‍या राज्याचे अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदिंसह सर्व मंत्रीमंडळ आणि विधानसभा व विधान परिषद सदस्यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व जिल्हाध्यक्षांनी जाहीर आभार मानले.
राज्य अधिवेशनातील दोन प्रमुख मागण्या मार्गी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पेन्शनसह पत्रकारांना शिवशाही बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळावी यासह विविध मागण्या लावून धरल्या होत्या. यासंदर्भात राज्यव्यापी पुण्यातील मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लवकरच पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्‍न मार्गी लावू असे अभिवचन दिले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिलेला शब्द अखेर पाळला. याच आंदोलनात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांना शिवशाही बसमधून विनामुल्य प्रवास सुविधा देण्याची जाहीर घोषणा केली. ती देखील मंजूर झाली. या दोन प्रमुख पत्रकारांच्या मागण्या मार्गी लागल्या.

पेन्शन योजना लागू पण लढा कायम ः  
पत्रकारांची पेन्शन योजना सरकारने सुरू केली त्याबद्दल अभिनंदन. मात्र सरकारने 60 वर्ष पूर्ण झालेल्या राज्यातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानपूर्वक पेन्शन योजना लागू करावी. त्याचबरोबर पेन्शनधारक पत्रकारांच्या मृत्युपश्‍चात शासकीय सेवानिवृत्त कर्मचार्‍यांप्रमाणे सदरील पेन्शन सन्मान योजना त्यांच्या कुटुंबियास राज्य सरकारने देय करावी, तसेच महागाई लक्षात घेता वीस हजार रुपयापर्यंत दरमहा पेन्शन देण्यात यावी. या मागण्यांसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करेल असे शासकीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष तथा पत्रकार संघाचे ःप्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंडे यांनी म्हटले आहे.