लटपटे आत्महत्या प्रकरणी संजीव उन्हाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद -औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार सुंदर उर्फ दिलीप लटपटे यांच्या आत्महत्या प्रकरणी अखेर ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, त्यांच्या भगिनी आणि मयत लटपटे यांच्या पत्नी वृंदा उन्हाळे यांच्या विरुद्ध पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि 306, 34   नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत पत्रकार सुंदर लटपटे यांचा संजीव उन्हाळे यांच्या भगिनीबरोबर आंतरजातीय विवाह झाला होता, लग्न झाल्यापासून उन्हाळे यांनी लटपटे यांना मानसिक त्रास दिला होता.  इतकेच काय तर घटनेपूर्वी सहा महिने अगोदर लटपटे पती -पत्नीत फूट पाडून दोघांना विभक्त केले तसेच उन्हाळे यांनी पोलिसांकडे खोट्या तक्रारी केल्या, त्यामुळेच सुंदर लटपटे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.  ही फिर्याद मयत सुंदर लटपटे यांचे चुलत भाऊ भाऊसाहेब लटपटे यांनी दिली आहे.

लोकपत्र, पुण्यनगरी, पुढारी आदी वृत्तपत्रात संपादक, कार्यकारी संपादक आदी पदावर काम केलेल्या सुंदर लटपटे (वय ५६)  यांनी, १४ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली होती. त्यात त्यांचा मेहुणा ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, त्यांच्या भगिनी आणि मयत लटपटे यांच्या पत्नी वृंदा उन्हाळे- लटपटे यांची नावे होती.

ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी राजकीय दबाब आणला होता. तसेच औरंगाबाद मधील एका पत्रकारांचे शिष्टमंडळ देखील पोलीस आयुक्त यांना भेटले होते, मात्र लटपटे यांच्या भावाच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.