संभाजी ब्रिगेडची लोकमत कार्यालयात धडक...

पुणे - दैनिक लोकमतच्या  कालदर्शिका या कॅलेंडरमध्ये  एका लेखात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण केल्यामुळे संभाजी  ब्रिगेडचे कार्यकर्ते संतप्त झाले असून, प्रसिद्ध झालेले कँलेंडर वाटप  करू नये तसेच लोकमतने आपल्या अंकात जाहीर माफी मागावी, अशी भूमिका घेतली आहे. 

लोकमत कालदर्शिका या दै. लोकमत च्या  कॅलेंडरमध्ये  एप्रिल महिन्याच्या पानावर श्री. श्री. रविशंकर यांनी लिहलेला एक लेख आहे. सदरील लेखात 'छत्रपती शिवरायांचा' अवमान करत त्यांना दैववादी व पराक्रमशून्य दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला आहे. ज्या रामदासांचा व छत्रपती शिवरायांचा काहीही संबंध नाही असे इतिहासकारांनी व न्यायालयाने अधिकृत सांगितले असतांना हे विकृत लिखाण करणाऱ्या व ते छापणाऱ्या विकृत मेंदूचा समाचार घेतलाच पाहिजे, असे संभाजी  ब्रिगेडचे म्हणणे आहे.

दै. लोकमत कॅलेंडर (कालदर्शिका) मधून छत्रपती शिवाजी महाराजांना दैववादी व पराक्रमशून्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच समर्थ रामदास गुरु असल्याचं लिखाण केले आहे. असले खोटे किती दिवस सहन करायचे ? असा सवाल संभाजी  ब्रिगेडने केला आहे. शिवप्रेमींनो महाराष्ट्रात या लोकमत कॅलेंडरची  विक्री करू देऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.

संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे यांच्यासह एका शिष्टमंडळाने लोकमत कार्यालयात धडक मारून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तेव्हा वितरीत केलेले सर्व अंक परत घ्यावेत तसेच लोकमतने जाहीर माफी मागावी, असे ठणकावून सांगितले.