संपादकांनी एकसंघ होण्याची गरज- अँड. निकम

जळगाव- ‘संपादक : एक माणूस’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, पूर्णवादचे कुलगुरू विद्याधर पानट, डॉ.गणेश मुळे, सौ.शांता वाणी, गिरीश कुळकर्णी यांच्या समवेत दीपक पटवे, सचिन जोशी, श्रीमंत माने, धों.ज.गुरव, प्रमोद बर्‍हाटे, अनिल पाटील व हेमंत अलोने.
जळगाव-समाजहितासाठी संपादक एकत्र आल्यास जिल्ह्यातील अनेक विषयांना न्याय मिळू शकेल, यामुळे त्यांनी एकसंघ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. येथील आशा इंडिया फाऊंडेशनच्या ’अभिनित’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णवाद विद्यापीठाचे कुलगुरू तथा ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट तर प्रमुख वक्ते म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माहिती अधिकारी डॉ.गणेश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘संपादक-एक माणूस’ हा विषय घेऊन ‘अभिनित’ने तिसरा दिवाळी अंक यंदा प्रकाशित केला. त्याचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात झाले. याप्रसंगी शहरातील सर्व दैनिकांचे संपादक व संपादकीय जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांचा, लेखकांचा सत्कार करण्यात आला. यात दैनिक सकाळचे संपादक श्रीमंत माने, ‘गांवकरी’चे संपादक धों.ज.गुरव, दै.देशदूतचे संपादक हेमंत अलोने, ‘साईमत’चे संपादक प्रमोद बर्‍हाटे, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक दीपक पटवे, ‘लोकशाही’च्या संपादिका सौ.शांता वाणी, ‘तरुण भारत’चे संपादक सचिन जोशी व ‘पुण्यनगरी’चे वृत्तसंपादक अनिल पाटील यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. याशिवाय, चंद्रकांत भंडारी, प्रा.प्रभात चौधरी, किशोर कुळकर्णी, डॉ.सुधीर भटकर, विभाकर कुरंभट्टी, प्रदीप रस्से, कपिल चौबे, प्रा.नामदेव कोळी, धन्यकुमार जैन, चित्रकार सुतार आदींचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
सत्कारार्थी संपादकांच्या वतीने ‘पुण्यनगरी’चे वृत्तसंपादक अनिल पाटील यांनी ‘संपादकातील माणूस’ यावर मनोगत व्यक्त केले. कुलगुरू पानट म्हणाले की, फाउंडेशनने ’संपादक : एक माणूस’ हा विषय दिवाळी अंकासाठी ठेवून संपादकांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला. समाजात एका दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून वावरणारा संपादक घरी कसा असेल याविषयी सर्वांनाच कुतूहल असते. या माध्यमातून वाचकांना संपादक कळतील. एकाच व्यासपीठावर एवढया मोठया प्रमाणात संपादकांनी येणे ही एक दुर्मीळ घटना असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
डॉ.मुळे यांनी बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानातील बदलाप्रमाणे पत्रकारांनीही स्वत:मध्ये बदल करावा, असे आवाहन केले. ‘आशा इंडिया फाऊंडेशन’चे प्रकल्प संचालक व ‘अभिनित’चे संपादक गिरीश कुळकर्णी यांनी दिवाळी अंकाची माहिती प्रास्ताविकातून दिली. सूत्रसंचालन मनोज गोविंदवार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विजय डोहळे यांनी करून दिला. अपर्णा चौघुले यांनी ’वंदे मातरम’ आणि ’पसायदान’ सादर केले तर स्वप्नील पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments