माध्यमांनी जबाबदारीचेही भान ठेवावे - चव्हाण

नागपूर - प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाहीतील दोष मांडण्याचे आणि ती सुदृढ करण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होते. तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे आता प्रत्येकाला ‘सिटिझन र्जनालिस्ट’ होण्याची संधी आहे व याच तंत्रज्ञानाचा वापर करून समाजात प्रक्षोभ निर्माण करण्याचेही प्रयत्न होत आहेत. एकूणच प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य गरजेचे आहे; पण त्यांच्यात जबाबदारीची जाणीवही महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी येथे केले.
पत्रपंडित पद्मश्री पां. वा. गाडगीळ व बाबा दळवी स्मृती लोकमत पुरस्कार वितरण समारंभ लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. लोकमत मीडिया लि.चे चेअरमन खा. विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनेचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी प्रमुख वक्ते होते. लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार, पुणे आवृत्तीचे संपादक विजय बावीस्कर, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत टाइम्सचे संपादक के. एन. राघवेंद्र, पुरस्कार समितीचे संयोजक कमलाकर धारप व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, प्रसार माध्यमांवर अंकुश हवा का? अशी चर्चा सुरू झाली आहे. सामान्यांमध्ये या विषयावर संयमाने चर्चा होत असली तरी राजकीय वतरुळात या विषयावर अधिक चर्चा होते. या मुद्यावर संघर्षाची स्थितीही निर्माण होते. नकारात्मक बातम्यांमधूनच वृत्तपत्रांचा विकास होतो, असे नाही. प्रसंगी चांगल्या बाबीही प्रकर्षाने मांडल्या पाहिजे. प्रसार माध्यमांची वाटचाल ही सकारात्मक आणि समाजाला मदत होईल, अशा पद्धतीने असावी. प्रसार माध्यमांना मैलाच्या दगडाचे महत्त्व आले आहे.
‘व्हिसल ब्लोअर’ येत आहे
केंद्र सरकार लवकरच ‘व्हिसल ब्लोअर’ हे विधेयक सादर करीत आहे. एखाद्या व्यक्तीला शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची माहिती मिळाल्यास त्याने ती योग्य व्यक्तीला सांगायची. ही माहिती देणार्‍या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. देश समृद्ध, विकसित आणि महाशक्ती होण्यासाठी प्रसार माध्यमांचा सकारात्मक विचार गरजेचा आहे.
ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी बहारदार संचालन केले. लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने समारोप झाला.
धाडसाचे कौतुक गरजेचे
आपल्याच माणसांना सन्मानित करणे हे स्वाभाविक आहे. मात्र अन्य वृत्तपत्र, मासिक, नियतकालिकांमधील पत्रकारांचा सन्मान करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. पत्रकारांनी प्रसंगी जीवावर उदार होऊन समाज ढवळून निघेल, अशी माहिती समोर आणली आहे. हे धाडसाचे काम आहे. अशा पत्रकारांना पुरस्कृत करणे, त्यांच्या धाडसाचे वर्णन करणे गरजेचे आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात दडलेले रत्न शोधणे आणि त्यांना पुरस्कृत करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. अनेक दिग्गजांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले आहे. आज मला हा बहुमान मिळाला. मी आभारी आहे.
‘लोकमत’ सर्व विचारांचे व्यासपीठ
लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांनी ‘लोकमत’चे रोपटे लावले. त्यांनी नफा कमविणे एवढाच उद्देश ठेवला नाही. कायम सामाजिक बांधिलकी जपली. राजकीय विचारांना अनुसरून या वृत्तपत्राची वाटचाल सुरू असली तरी सर्व विचारांना या वृत्तपत्राने स्थान दिले. आज खा. विजय दर्डा यांच्या नेतृत्वात लोकमत वृत्तसमूहाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
पुरस्कारविजेते
पत्रपंडित पद्मश्री पां. वा. गाडगीळ सामाजिक-आर्थिक-विकास लेखनाचा पहिला पुरस्कार लोकमत नाशिकचे संपादक हेमंत कुळकर्णी यांना मिळाला. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. द्वितीय पुरस्कार लोकमत नागपूरचे निवासी संपादक मोरेश्‍वर बडगे यांना मिळाला. ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तृतीय पुरस्कार पुणे येथील विमल मधुसूदन खाचणे यांना मिळाला. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारितेचा पहिला पुरस्कार सातारा लोकमतच्या उपसंपादक प्रगती जाधव पाटील यांना मिळाला. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नीलेश फाळके (सकाळ- यवतमाळ) यांना द्वितीय पुरस्कार मिळाला. ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे विश्‍वास पाटील यांना तृतीय पुरस्कार मिळाला. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या