अहमदनगर -दिव्य मराठीच्या नगर आवृत्तीचे ब्युरो चीफ म्हणून मिलिंद बेंडाळे यांनी आज सूत्रे स्वीकारली. बेंडाळे हे सकाळमधून आलेले आहेत. दिव्य मराठीचे पूर्वीचे राजकीय संपादक बाळ ज. बोठे-पाटील यांच्या पठडीत तयार झालेल्या बेंडाळे यांनी यापूर्वी सकाळमध्ये तेरा वर्षे विविध पदांवर काम केले आहे.
बोठे-पाटील सकाळमध्ये आणि बेंडाळे दिव्य मराठीत असा गुरू- शिष्याचा सामना आता नगरमध्ये रंगणार आहे.बोठे-पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर दिव्य मराठीकडून नव्या सहकारयांचा शोध सुरू होता. त्यासाठी अनेक जण इच्छूक होते. देशदूत, गावकरी, लोकसत्ता, सकाळ या वृत्तपत्रांत नगरमध्ये काम करणारया काही प्रमुख पत्रकारांनी यासाठी मुलाखती दिल्या होत्या. पण शेवटी बेंडाळे यांचीच वर्णी लागली. बेंडाळे यांनी सकाळमध्ये नगर, नाशिक, पुणे या ठिकाणी विविध पदांवर काम केलेले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सकाळचा राजीनामा दिलेला होता. सकाळमध्ये काम करताना बेंडाळे हे बोठे-पाटील यांचे समर्थक मानले जात. त्यांच्या पठडीत ते तयार झाले. जिल्ह्यातील राजकारण, शेती, उस, साखर, पाणी, दूध यांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. पर्यावरण, वने, वन्यजीव हे त्यांचे अभ्यासाचे विषय. यासंबंधी आणि दूध भेसळीसंबंधी त्यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या मालिका चांगल्याच गाजल्या. दिव्य मराठीत झालेल्या निवडीमुळे बोठे- पाटील यांचे अद्यापही दिव्य मराठीत वजन असल्याचे दिसून येते. आता बोठे - पाटील सकाळमध्ये आणि बेंडाळे दिव्य मराठीत एकेकाळी एकत्र काम करणारे हे दोन सहकारी आता स्पर्धक म्हणून कसे काम करतात, याकडे जिल्ह्यातील पत्रकारांचे लक्ष लागले आहे. दिव्य मराठीत आणखी काही पदे भरण्यात येणार असल्याचे समजते.
0 टिप्पण्या