मराठी पत्रकार दिन दिल्लीत रंगला हिंदीत!

नवी दिल्ली - मराठी पत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना राजधानीत चक्क आज हिंदीतून आदरांजली वाहण्यात आली! निमित्त होते मराठी पत्रकार दिनाचे. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीतील परिचय केंद्राच्या स्थापनादिनी झालेल्या या कार्यक्रमात किमान नव्वद टक्के अस्सल मराठी लोक असूनही केवळ एका पाहुण्यासाठी संपूर्ण कार्यक्रम हिंदीतून रेटण्याचा अट्टहास करण्यात आला.

दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे मराठी पत्रकार दिन साजरा झाला. मात्र, यासाठी तयार केलेल्या फलकावरील "निमित्य'सारख्या शब्दांपासूनच राजधानीतील मराठीच्या परिस्थितीचे दर्शन घडायला सुरवात झाली. या कार्यक्रमाला दिल्ली मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक वानखेडे व पत्रकार अनिल शर्मा प्रमुख पाहुणे होते. शर्मा यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजकांनी हिंदीतून रेटल्याचे वारंवार जाणवत होते. मूळच्या पंजाबी असलेल्या परिचय केंद्राच्या अधिकारी अमरज्योत अरोरा यांनीही आवर्जून मराठीतच बोलण्याचा निर्णय अमलात आणला. मात्र, महाराष्ट्राच्या उपसंचालकांसह सगळे जण उपस्थित मराठी भाषकांना मराठी पत्रकारितेचे महत्त्व चक्क हिंदीतून समजावून सांगत होते. विशेष म्हणजे मुख्य कार्यक्रमानंतरच्या अनौपचारिक चर्चेचा सूरही हिंदीच राहिला तेव्हा "मराठी पत्रकारदिनी तरी मराठीत बोला,' असे काही उपस्थितांना सांगावे लागले!

शर्मा यांनी माध्यमांच्या म्हणजेच लेखणीच्या क्रांतीची भारतात सर्वाधिक गरज असल्याचे सांगितले. वानखेडे यांनी आपल्या तिरकस शैलीत विकास पत्रकारितेला आज जागाच उरली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. मोठी वृत्तपत्रे किंवा बड्या वाहिन्यांचे "इंटरेस्ट' वेगळे असतात हे मान्य केले तरी समाजात चांगल्या घटनांच्या बातम्या देण्यास कोणीही संपादक किंवा मालक नाही म्हणत नाही. मात्र, बाबा आमटेंच्या वंशजांच्या वृत्ताला जागा द्यायची की कतरिना कैफ पाय घसरून कोठे पडली याची बातमी करायची याचे तारतम्य पत्रकारांनी बाळगले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उपसंचालक गणेश रामदासी यांनी प्रास्ताविक केले.

"पाकीट' संस्कृती नाही!
महाराष्ट्रातील मंत्री वा नेत्यांना दिल्लीतील पत्रकारांकडून अद्याप "पाकिटांसाठी' त्रास होत नाही असे उल्लेखनीय व अभिमानास्पद असल्याचे वानखेडे यांनी नमूद केले. त्याच वेळी किमान महाराष्ट्र सदनात मराठी खाद्यपदार्थ सातत्याने व वाजवी दरात मिळावेत तसेच मराठी पत्रकारांना राज्य शासनाची अधिस्वीकृती पत्रे लवकर मिळावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या