'दिव्य मराठी'च्या सोलापूर आवृत्तीचे लोकार्पण

सोलापूर - अवघ्या वर्षभराच्या आत मराठी मनाचा ठाव घेणाऱया दैनिक भास्कर समूहातील दैनिक दिव्य मराठीच्या सोलापूर आवृत्तीचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या साथीने आणि असंख्य सोलापूरकरांच्या साक्षीने शनिवारी संपन्न झाला. आपल्या मर्जीचे वृत्तपत्र शहरातून प्रसिद्ध होणार असल्याने त्याच्या स्वागतासाठी येथील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात असंख्य सोलापूरकर जमले होते.

प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार सुमित्रा महाजन, राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दैनिक भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र आगरवाल हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. दिव्य मराठीच्या स्वागतासाठी शहरातील विविध चौकांमध्ये सुरेख रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या.

दिशा देण्याचे आणि प्रबोधनाचे काम भास्कर समूह करतोय - सुशीलकुमार शिंदे

लोकांना दिशा देण्याचे आणि त्यांचे प्रबोधन करण्याचे काम दैनिक भास्कर समूह करीत आहे. हे वृत्तपत्र जनतेचे असल्याचे समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र आगरवाल यांनी सांगितले, हे खरंच खूप चांगले आहे. गेल्या १८-२० वर्षांपासून मी या समूहाला ओळखतो आहे. त्यांचे वृत्तपत्र खरोखरच निःपक्ष आहे. गेल्या दहा महिन्यांत या समूहाने मराठीमध्ये पाच आवृत्त्या काढल्या आणि आणखी पाच आवृत्त्या काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. देशाच्या ऊर्जानिर्मितीमध्येसुद्धा हा समूह उतरला आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेत ५५ हजार मेगावॉटची निर्मिती केंद्र सरकारने केली आहे. ही विक्रमी वीजनिर्मिती आहे. सोलापूर-पंढरपूर-अक्कलकोट-तुळजापूर या क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केली आहे. रस्त्याच्याबाबतीत आम्ही परिपूर्ण आहोत. विद्यापीठ स्थापन करून आता शैक्षणिक बाबतीतही आम्ही परिपूर्ण झालो आहोत. उजनी धरणातून पाईपलाईन सोलापूर शहरात आणण्यावरून माझ्यावर त्यावेळी मोठी टीका करण्यात आली. पण आज त्याचे फळ सोलापूरकरांना मिळते आहे.

दिव्य मराठी जनतेचा आवाज उठविणार - सुमित्रा महाजन

दिव्य मराठी हे कोणाचेही मुखपत्र नाही. हा पेपर जनतेचा आवाज उठविणारे वृत्तपत्र आहे. अशाच वृत्तपत्राची आपण अपेक्षा करतो. जनतेच्या भावना या कोठेतरी मांडता आल्या पाहिजेत. जनतेची लढाई लढण्यासाठी हे वृत्तपत्र मराठीत आले आहे. मराठीतील प्रथितयश लोकांना बरोबर घेऊन या समूहाने मराठीमध्ये काम सुरू केले आहे. सोलापूरकरांच्या विकासाची लढाई या वृत्तपत्राने सुरु केली आहे. सोलापूर म्हटले की येथील चादरींचा विषय निघतो. याच परंपरा आता या शहराच्या समस्या बनल्या आहेत. इंदूरमध्येही अशाच समस्या होत्या परंतु, आज त्यावर मात करून तेथे औद्योगिक विकास साध्य करण्यात आला आहे. हे सोलापूरमध्येही होऊ शकते. दिव्य मराठी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.  

उपेक्षित वर्गाचा हुंकार मांडण्याचे काम दिव्य मराठीने करावे - लक्ष्मणराव ढोबळे

सध्याच्या इंटरनेटच्या युगात वृत्तपत्राची परंपरा खंडीत होणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना चॅनेल्सच्या भाऊगर्दीतही वृत्तपत्रांची पाने वाढताहेत, ही निश्चितच चांगली बाब आहे. ध्येयवादी वृत्तपत्रांचा समाजावर पूर्वी मोठा दबदबा होता. अशी वृत्तपत्रे आजही मोठ्या दिमाखात काम करताहेत. न्यूयॉर्क टाईम्स, लंडनमधील टाईम्स यासारख्या वृत्तपत्रासारखे दिव्य मराठी हे एक वृत्तपत्र असेल, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. साहित्याची उर्मी आणि पत्रकारीतेतील नवा अंकुर जपण्याचे काम दिव्य मराठीने करावे. समाजातील उपेक्षित वर्गाचा हुंकार मांडण्याचे काम या वृत्तपत्राने केले पाहिजे. 

विविध राज्यांना दैनिक भास्करने प्रगतीपथावर नेले - विजयसिंह मोहिते-पाटील

देशातील विविध राज्यांना अप्रत्यक्षरित्या प्रगतीपथावर नेण्याचे काम दैनिक भास्कर समूहाने केले आले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. सोलापूरमध्ये नवीन उद्योगधंदे आणायचे असल्यास उजनी धरणात पाणी आणले पाहिजे. सध्या उजनी धरणामध्ये दहा टीएमसी सांडपाणी येते. त्यामुळे सोलापूरकरांवर दूषित पाणी पिण्याची वेळ येते. उजनी धरणातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी कोल्हापूरमधून पाणी आणले पाहिजे. शहरातील रस्ते सुधारले पाहिजेत आणि बंद पडलेली विमानसेवा सुरू केली पाहिजे. त्यासाठी मनापासून सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे.

येत्या सहा महिन्यांत सोलापूरात विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट दिव्य मराठीने ठेवले आहे. यासाठी दैनिक भास्कर समूह स्वतः विविध विमान कंपन्यांशी चर्चा करेल, असे मनोगत रमेशचंद्र आगरवाल यांनी व्यक्त केले. जनतेची मते सरकारपर्यंत पोचवून सोलापूरला पुढे आणायचे आहे. वृत्तपत्राचे काम सूचना आणि लेख देणे हे तर आहेत. पण त्याचबरोबर त्यांचे सामाजिक उत्तरदायित्वही आहे. हे काम दिव्य मराठी करणार आहे. येत्या पाच वर्षांत सोलापूर मोठे महानगर बनावे, ही भास्कर समूहाची कल्पना आहे, असेही आगरवाल यांनी स्पष्ट केले.

इतर माध्यमे वाढताहेत त्याचप्रमाणे वृत्तपत्रांची पानेही वाढताहेत. स्वस्तामध्ये साईस्करपणे सुसंस्कृत करणारे हे माध्यम आहे. मराठी भाषा विकसित करायची असेल तर वृत्तपत्राची गरज आहे, असे मत दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले. केवळ नाउमेद करणारया बातम्या न देता चांगले आहे ते प्रकर्षाने दाखवणे, हेच दिव्य मराठीचे मुख्य सूत्र असेल, असेही केतकर यांनी सांगितले.

दैनिक भास्कर समूहाचे देशभरात १.९१ कोटी वाचक आहेत. त्यामध्ये आता सोलापूरकरची भर पडणार आहे. दैनिक भास्कर समूहाची ही देशातील ६५ वी आवृत्ती आहे. गेल्यावर्षी २९ मे रोजी दैनिक दिव्य मराठीची पहिली आवृत्ती औरंगाबादमध्ये सुरू झाली. औरंगाबादमधील मराठी वाचकांनी या वृत्तपत्राला भरभरून प्रतिसाद दिला आणि पहिल्या दिवसापासूनच दिव्य मराठी शहरातील नंबर एकचे वृत्तपत्र बनले. त्यानंतर तीन जुलै रोजी नाशिक येथे दुसरी आवृत्ती सुरु करण्यात आली. ११ सप्टेंबरला जळगावला तिसरी तर १६ ऑक्टोबरला अहमदनगरला चौथी आवृत्ती सुरु करण्यात आली. दिव्य मराठीने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आपले स्थान निर्माण केल्यानंतर आता सोलापूरच्या रुपाने पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. एक एप्रिलपासून सोलापूरकरांना दिव्य मराठीचा अंक मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments