‘स्टार माझा’ होणार ‘एबीपी माझा’

नवी दिल्ली : ‘स्टार माझा’ या लोकप्रिय मराठी न्यूज चॅनलच्या नावात लवकरच ‘एबीपी माझा’ असा बदल करण्यात येईल, अशी घोषणा एमसीसीएसच्या वतीनं आज करण्यात आली. एमसीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वेंकटरमणी यांनी ही माहिती दिली.

‘स्टार माझा’ हे मराठी न्यूज चॅनल, मीडिया कण्टेन्ट अँड कम्युनिकेशन्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (एमसीसीएस) या कंपनीच्या मालकीचं आहे. ‘एमसीसीएस’मध्ये आनंद बझार पत्रिका ग्रुप (एबीपी) आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन उद्योगसमूहांची भागीदारी आहे. एबीपी आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगसमूहांनी त्या भागिदारीतून स्वतंत्र होण्याचा निर्णय परस्परसामंजस्यानं घेतला आहे. त्यानुसार स्टार ब्रँडचं एमसीसीएसशी असलेलं नातं खंडित करण्याचंही एबीपी आणि स्टार इंडिया यांनी मान्य केलं आहे.
स्टार इंडियाच्या व्यवसायाचा मुख्य केंद्रबिदू हा मनोरंजन असून, भविष्यात स्टारनं मनोरंजन क्षेत्रावरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. एबीपी समूह हा प्रामुख्यानं वृत्तव्यवसायात कार्यरत आहे आणि नजीकच्या काळात ‘एमसीसीएस’ या कंपनीच्या माध्यमातून टेलिव्हिजन न्यूजक्षेत्रात आपला ब्रँड उभा करण्याचा आणि तो वृद्धिंगत करण्याचा निर्णय एबीपी समूहानं घेतला आहे. त्यामुळं ‘स्टार माझा’ या मराठी न्यूज चॅनलच्या नावात लवकरच ‘एबीपी माझा’ असा बदल करण्यात येईल. तसंच एमसीसीएसचं हिंदी न्यूज चॅनल ‘स्टार न्यूज’ आणि बंगाली न्यूज चॅनल ‘स्टार आनंदा’ यांच्या नावात अनुक्रमे ‘एबीपी न्यूज’ आणि ‘एबीपी आनंदा’ असा बदल करण्यात येईल.

एमसीसीएसचं स्टार ब्रँडशी तब्बल आठ वर्ष अतिशय दृढ नातं होतं. या नात्याचा लाभ दोघांनाही झाला. या आठ वर्षांत तिन्ही न्यूज चॅनल्सनी टेलिव्हिजन न्यूज व्यवसायात मानाचं स्थान मिळवलं आहे. माझा आणि आनंदा या न्यूज चॅनल्सनी तर अनुक्रमे मराठी आणि बांगला भाषेतलं पहिल्या क्रमांकाचं न्यूज चॅनल अशी ओळख मिळवली आहे. त्यामुळं साहजिकच टेलिव्हिजन न्यूज व्यवसायात ‘एमसीसीएस’ या कंपनीचं नाव आज मोठ्या आदरानं घेतलं जातं.

विश्वासार्हता ही एमसीसीएसची ओळख बनली आहे. एमसीसीएसचा प्रत्येक शिलेदार ती विश्वासार्हता टिकवण्यासाठी नेटानं झटत असतो. आणि म्हणूनच एमसीसीएसनं प्रेक्षक, जाहिरातदार, डिस्ट्रीब्युटर्स आदी प्रत्येक घटकाशी विश्वासाचं आणि आपुलकीचं नातं जोडण्यात यश संपादन केलं आहे. एमसीसीएसच्या तिन्ही चॅनल्सचं नेतृत्त्व सक्षम संपादकांच्या हाती आहे. या संपादकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पत्रकार, अँकर्स आणि तांत्रिक कर्मचारी आपल्या प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ पत्रकारितेचा दर्जा कायम सर्वोच्च स्तरावर राखण्यासाठी सातत्यानं झटत आहेत. भविष्यकाळातही या तिन्ही चॅनल्सवरच्या बातम्यांचा सर्वोत्तम दर्जा कायम राखण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील, असं एमसीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वेंकटरमणी यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या