अमित पवारची फेसबुकवरची अस्वस्थ करणारी पोस्ट....

(बाळासाहेबांच्या 'सामना'त किती खदखद आहे, कर्मचारी असुरक्षित आहे; चांगल्या माणसांचा कसा गेम होतो त्याचे अनेक किस्से आहेत..  आई-बापाविना पोरक्या, अनाथ असलेल्या, मुंबापुरीत एकट्याच राहणारया अमित पवारसारख्या संवेदनशील माणसाचेही या निर्ढावलेल्या मंडळीनी अतोनात मानसिक छळ केला. तिथली सारी व्यवस्था ही सरकारी कार्यालयात जशी दलालांच्या ताब्यात असते तशी काही बाटग्यांच्या ताब्यात आहे. हे बाटगे शिवसेनेच्याच कार्यकर्ते, पदाधिकारयांकडून फोटो लावण्याचे 500 -500 रुपये वसूल करतात. खासदार संपादकांचेही या बाटग्यांना आता भय उरलेले नाही. किंवा मग खासदार संपादक हे सारे माहिती असूनही खपवून घेत आहेत. का? कशासाठी? एका अनाथ पोरालाही त्यांनी न्याय देवू नये, त्याचा खुश्शाल गेम होवू द्यावा? दुसरीकडे मराठी कुटुंबांना घर मिळवून देण्याच्या नावाखाली १५-२० लाखांना फसविणारा एखादा निर्ढावलेला म्हाडातील दलाल गांडीवर लाथ मारून हाकलून दिल्यानंतर पुन्हा मागल्या दाराने संस्थेच्या सेवेत घेतला जातो. का? त्याच्या दुकानदारीतून या बाटग्यांना मलिदा लातायाचाय म्हणून? अरे मग कशाला मराठी माणसाच्या नावावर राजकारण करतात? मराठी माणसांना फसविणारा एकदा हाकलून दिल्यावर 'सामना'ची पायरी पुन्हा चढण्याची हिम्मत कशी करू शकतो? बरे त्याला जर खासदार संपादकांनी हाकलून दिले आहेत तर खालचा हिंदीतील संपादक पुन्हा अशा लफडेबाजाला कसा सेवेत घेतो? याचा अर्थ तो वरच्या खासदार संपादकाला जुमानत नाही, कोलतो... 'सामना'मधील वरच्या मजल्याचा दबदबा तर संपला नाही ना? खालचे यूपी-बिहारवाले भय्या वरचढ होवू लागलेत का? बाळासाहेब आता तुम्हीच बघा... )

अमित पवारची फेसबुकवरची अस्वस्थ करणारी पोस्ट....

एका 'सामना'वीराचे पत्र ....

समस्त सामनावीरांना,
साष्टांग नमस्कार!

हिंदू पंचांग शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा हे नववर्ष वृत्तवाहिन्यांनी जल्लोषात साजरे केले. आणि माझ्यासमोर ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांच्या एका वृत्तपत्रातील साडेतीन वर्षांचा धगधगता इतिहास नजरेसमोरून तरारून गेला. आणि माझ्यातील रिकामटेकडा साहित्यिक जागा झाला (साहित्यिक रिकामटेकडेच असतात असे त्या वृत्तपत्रातील एका सहृदयी आणि आदरणीय सह-संपादकांनीच मला सांगितले) त्या कालावधीत वृत्तपत्रातील अनेक स्थित्यांतरे पाहण्याचे भाग्य मला लाभले. या वृत्तपत्रातील मुख्य-उपसंपादकांच्या खुर्चीचा महिमा अगाध आहे. देशाच्या राजकारणात उत्तरप्रदेशच्या सत्ताकारणाला जेवढे महत्व नसेल तेवढे या खुर्चीला आहे.

सध्या या तख्तावर नागोठण्यातील एका 'प्रवाळा'ची नाईलाजास्तव (किंवा चलाख राजकीय खेळी म्हणून )प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अधिक सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हा प्रवाळ म्हणजे कीटकजन्य तांबूस रंगाचा 'खडक' (मंगळ हादेखील तांबूस रंगाचाच असतो). तर सांगायचे तात्पर्य असे कि या महाशयांना आपल्या कर्तुत्त्वाचा प्रचंड अभिमान.

प्रतिकूल परिस्थितीचा 'सामना' करीत सागरापासून सुरु झालेल्या आपल्या खडतर प्रवासाचे रसभरीत किस्से (वाचकांनी स्वा. सावरकरांना अंदामानास नेतेवेळी घडलेला सागर प्रवास हा संदर्भ जोडल्यास त्यांच्या कर्तुत्त्वाची महती समजेल) ते नेहमी आपल्या अनुयायांना सांगत असतात. हे महाशय इतके लवचिक आहेत कि राहुल बाबांचे जोडे उचलणारे महाराष्ट्रातील मंत्री रमेश बागवे हेदेखील त्यांच्यापुढे खुजे वाटावेत. या त्यांच्या 'सद' गुणांमुळेच ते इथवर पोचले असावेत. असो ! दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारिता कशी असावी हे सांगितले. हाडाचा पत्रकार कसा असावा हे सर्वचजण सांगतात. मात्र बातमीदारी कशी करू नये याचे धडे हे महाशय आपल्या समर्थकांना देत असतात. यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे. आपणच त्रिकालवेधी आहोत असा यांचा (गैर) समज. एखाद्या प्रामाणिक बातमीदाराच्या बातमीचा गळा घोटून त्या बातमीदाराला कसे गुदमरून सोडावे हे कसब त्यांच्याकडून शिकावे. हे महाशय आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यात डॉक्टर गोबेल्सला देखील लाजवेल अशा प्रचार तंत्राचा वापर करतात. बातमीदारी कशी असू नये हे ज्याला शिकायचे असेल त्याने हे सर्व 'गुण' आत्मसात करावेत. माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराला त्यांच्याकडून लिहिण्याची प्रेरणा मिळाली याबद्दल त्यांचे शतशः आभार.

माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समस्त सामनावीर आदर बाळगतील अशी आशा व्यक्त करतो. (पत्रकारितेच्या भ्रामक कल्पनांनी भारावून जाऊन या देशात प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे, असे मी बाळशास्त्री जांभेकरांच्या बाण्यात म्हंटले होते. त्यावेळी एका उपेक्षित आणि दुर्लक्षित (त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास ) आदरणीय विभाग प्रमुखांनी मला बाळासाहेबांच्या आवेशात ,'ते कार्यालयाच्या बाहेर' असे ठणकावून सांगितले होते हुकुमशाही राजवटीत अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्य मानणाऱ्या 'बंडखोरां'ची मुस्कटदाबी कशी होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्याक्षणी मला आला). शेवटी व्होलतेअरचे वाक्य उदधृत करून मी माझा पत्र प्रपंच येथेच संपवितो...

मी तुझ्या प्रत्येक मताशी असहमत आहे. तरीदेखील तुझ्या मताचे आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करण्याकरिता मी माझ्या प्राणांची बाजी लावीन.

लोभ असावा,
आपला नम्र
बोरुबहाद्दर