चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाचा कर्मवीर पुरस्कार जाहीर

चंद्रपूर - चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या 'कर्मवीर' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा डॉ.अ.तु. काटकर आणि महेंद्रकुमार जिवाणी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी १ ऑगस्ट रोजी आयोजित सोहळ्यात कर्मवीर पुरस्काराचे वितरण केले जाते. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ आणि पाच हजार एक रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी यंदा डॉ. अ.तु. काटकर आणि महेंद्रकुमार जिवानी यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. काटकर यांनी दैनिक महासागरपासून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर महाविदर्भ, लोकमतचे वार्ताहर, लोकमत समाचारचे पहिले जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी १0 वर्षे काम सांभाळले. पत्रकारितेसोबत त्यांनी सवरेदय शिक्षण मंडळात तब्बल ३५ वर्षे मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणूनही यशस्वी काम सांभाळले.
दुसरे मानकरी महेंद्रकुमार भिखालाल जिवानी हे कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील रहिवासी असून १९८0 पासून अतिदुर्गम तथा नक्षलग्रस्त कुरखेडा येथून वर्तमानपत्रात लेखन कार्याला सुरुवात केली. महाविदर्भ, चंद्रपूर समाचार, साप्ताहिक आदिवासी माणूस, जनवाद, नवभारत, लोकमत, लोकमत समाचार आदी वर्तमानपत्रातून त्यांनी लेखन केले. सद्य:स्थितीत 'विदर्भ चंडिका' या साप्ताहिकातून लेखन सुरू आहे. १९८0-९0 च्या दशकात साधन आणि संपर्काच्या सुविधा अल्प होत्या. त्यामुळे डोक्यावर वृत्तपत्रांचे गठ्ठे घेऊन नदीपार करून कुरखेड्यापर्यंत वृत्तपत्र पोहचवून पत्रकारिता जिवंत ठेवली. पत्रकारितेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 'कर्मवीर' पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments