'नवशक्ती'ने काढले स्वत:च्या अक्कलेचे दिवाळे....

मुंबई - 'जनसामान्यांची महाशक्ती' म्हणणाऱ्या दैनिक नवशक्तीने काल व आज स्वत:च्या अक्कलेचे दिवाळे काढून, पत्रकारितेत चुकीचा व घातक पायंडा पाडला आहे.
घडले असे की, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे दि.14 ऑगस्ट रोजी निधन झाले.त्याची सर्वच वृत्तपत्रांनी 15 ऑगस्ट रोजी बॅनर न्यूज केली.नवशक्तीही त्याला अपवाद कसा राहणार? मात्र नवशक्तीने मथळ्यातच विलासरावांचा 'स' गिळला.ही गंभीर चूक संपादकांच्या लक्षात येताच, त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट रोजी दिलगिरी व्यक्त केली .मात्र दिलगिरी व्यक्त करताना एक नवी मेख मारली.व्यवस्थापकीय संपादकांनी त्याचे खापर मुख्य उपसंपादक दीपक परब यांच्यावर फोडून स्वत: नामानिराळे राहिले.
नवशक्तीच्या अंकात  दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली जी चौकट छापण्यात आली आहे,त्यात म्हटले आहे की, मुख्य उपसंपादक दीपक परब यांच्यामुळे विलासरावांच्या बातमीचा मथळा चुकला.गंमत म्हणजे बुधवार दि.14 ऑगस्ट रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीत म्हटले आहे.काल 15 ऑगस्ट असताना खुलाश्यात पुन्हा तारखेची चूक करून नवशक्तीने स्वत:च्या अक्कलेचे दिवाळे पुन्हा वाजविले.
वास्तविक वृत्तपत्रातील कोणत्याही बातमी अथवा लेखात काही चूक झाली तर त्याला सर्वस्वी संपादक जबाबदार असतात.नवशक्तीच्या संपादकांनी मात्र त्याचे खापर मुख्य उपसंपादकांवर फोडून, त्याची जाहीर वाच्यता केली आहे.पत्रकारितेत अत्यंत चुकीचा व घातक पायंडा नवशक्तीने पाडला आहे.नवशक्तीच्या या खुलाश्याने राज्यातील पत्रकार संतप्त झाले आहेत.एखादी चूक घडली तर ती खुल्या दिलाने स्वीकारून, त्याची माफी मागणे अपेक्षित असताना,नवशक्ती कोणत्या थराला जात आहे,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सचिन परब यांनी नवशक्तीच्या संपादकपदाचा राजीनामा दिल्यानंतर तुषार नानल यांना संपादकपदावर बसविण्यात आले,मात्र सगळी सुत्रे मालकांचे विश्वासू व्यवस्थापकीय संपादक लखोटीया यांच्याकडे असल्याची चर्चा आहे.खुलाश्याच्या चौकटीत संपादक ऐवजी व्यवस्थापकीय संपादक असे म्हटले आहे.याचा अर्थ असा आहे की, लखोटीया यांनीच चुकीचे खापर दीपक परब यांच्यावर फोडले आहे...नवशक्तीत दोन गट आहेत.जुना गट नविन माणसंाना टिकू देत नाहीत, म्हणून काही जाणीवपुर्वक चुका केल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

जाता - जाता : निखिल वागळे महानगरचे संपादक,मालक असताना ते अशाच प्रकारे खुलासा करीत असत.ज्या माणसांच्या हातून चूक घडली,त्याचे नाव ते देत असत.नवशक्तीच्या व्यवस्थापकीय संपादकांनी वागळेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, ही परंपरा सुरू केली आहे.संपादक सर्वच बाबीकडे लक्ष देवू शकत नाहीत.गलेलठ्ठ पगार घेवून मुख्य उपसंपादक, वृत्तसंपादक अशी चूक करीत असतील तर संपादकांनी ते स्वत:वर अंगावर ओढवून का म्हणून घ्यावे,असा एक मतप्रवाह निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments