'सकाळ'च्या संपादक-संचालकपदी उत्तम कांबळे

पुणे - सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक तसेच समूहाच्या संपादकीय सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी उत्तम कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. "सकाळ' समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि व्यवस्थापकीय संचालक-संपादक अभिजित पवार यांनी आज येथे ही घोषणा केली. श्री. कांबळे गेली तीन वर्षे मुख्य संपादकपदाची जबाबदारी सांभाळत होते.

श्री. कांबळे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत आहेत. गेली 33 वर्षे ते पत्रकारितेत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. कोल्हापुरात बातमीदार म्हणून त्यांनी कारकिर्दीस प्रारंभ केला. "सकाळ' समूहात त्यांनी उपसंपादक, ज्येष्ठ उपसंपादक, नाशिक आवृत्तीचे वृत्तसंपादक, संपादक तसेच सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 9 मे 2009 रोजी त्यांची मुख्य संपादकपदी नियुक्ती झाली.

सामान्यांच्या जगण्याच्या लढाईला बळ देण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने केले. अलीकडच्या काळात सर्व शिक्षा अभियान आणि पोषण आहारातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्याचे काम त्यांच्या कारकिर्दीतच "सकाळ'ने केले. याशिवाय शाळांतील बोगस पटसंख्या, बोगस ग्रंथालयांची शहानिशा, सिंचनातील त्रुटी, वसतिगृहांतील अनागोंदी, दुष्काळाची भीषणता आदी विषयही आक्रमकपणे मांडले व त्याची सरकारपातळीवर दखल घ्यावी लागली.

श्री. कांबळे यांचे पत्रकारितेच्या बरोबरीनेच साहित्य क्षेत्रातील योगदानही मोठे आहे. लेखसंग्रह, कथा, कादंबऱ्या, संशोधन ग्रंथ, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, ललित लेख, संपादने असे विविध लेखनप्रकार त्यांनी हाताळले आहेत. त्यांची 40 हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. देवदासी प्रथा, भटक्‍या जाती-जमातींचे वेगळेपण, कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या इथपासून ते जागतिकीकरण आणि त्याचे परिणाम असे विविध विषय आणि काळ त्यांच्या लेखनात हाताळला गेला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचा शाळा आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, काही लेखनसंपदेचे हिंदी, कन्नड, इंग्रजी, मल्याळी आदी भाषांत अनुवाद झाले आहेत. सांगलीतील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व नंतर ठाण्यातील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही मानाची पदे त्यांनी भूषविली. साहित्य क्षेत्रातील 50 हून अधिक, तर पत्रकारितेच्या क्षेत्रातील 40 हून अधिक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

त्यांनी जर्मनी, ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांचे अभ्यास दौरे केले आहेत. उपराष्ट्रपती तसेच पंतप्रधानांसमवेत अनुक्रमे जी-15 व जी-8 देशांच्या परिषदेसाठीच्या परदेश दौऱ्यात सहभागी भारतीय पत्रकारांच्या चमूत त्यांचा समावेश होता. याशिवाय साहित्य व संस्कृती मंडळासह विविध शासकीय व सामाजिक संघटनांवर त्यांनी काम केले आहे.

ई - सकाळवरून साभार 



Post a Comment

0 Comments