मोहन मस्कर-पाटील यांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

सातारा  - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य विभागातर्फे व्यसनमुक्ती कार्याबद्दल पत्रकार गटातून देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार लोकमतच्या सातारा आवृत्तीचे उपसंपादक मोहन मारुती मस्कर-पाटील यांना पुण्यात झालेल्या पहिल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. पंधरा हजार रुपयांचा हा पुरस्कार आहे.

संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सामाजिक न्याय राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आ. उल्हास पवार, समाजकल्याण सचिव आर. डी.  शिंदे, समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, जिल्हाधिकारी विकास देशमुख, किरण मस्कर-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहन मस्कर-पाटील मुळचे चिंचेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली येथील असून सध्या ते लोकमत सातारा कार्यालयात उपसंपादक आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी व्यसमुक्तीच्या अनुषंगाने केलेले लेखन आणि व्यसनमुक्ती चळवळीतील सहभाग याचा विचार करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
ग्रामीण विकास, महिला सबलीकरण, पाणी, कृष्णा-खोरे, शेतकरी आत्महत्या, एचआयव्ही-एड्‌स, राजकारण, पर्यावरण हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. यापूर्वीही त्यांना सीएसई मीडिया फेलोशीप, व्यंकटेश चपळगावकर युवा प्रेरणा ऍवॉर्ड तसेच लोकमतअंतर्गत देण्यात येणारे चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.