प्रकाश पोहरे यांची तुरुंगात रवानगी

नागपूर - गोंडखैरी येथील देशोन्नतीच्या प्रिंटिंग प्रेससमोर केलेल्या गोळीबारात सुरक्षा रक्षक राजेंद्र दुपारेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी देशोन्नतीचे एडिटर इन चीफ प्रकाश पोहरे यांची सावनेर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आशिष अयाचित यांच्या न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्यांची मध्यवर्ती करागृहात रवानगी केली.
या प्रकरणी प्रकाश पोहरे यांना २३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथील फॉर्म हाऊसमध्ये अटक केली होती. त्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कळमेश्‍वर येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी विक्रमसिंग भंडारी यांच्या न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज दुपारी कळमेश्‍वर येथील न्यायालयात हजर करायचे होते.
मात्र, येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी भंडारी अवकाशावर असल्याने कळमेश्‍वर पोलिसांनी प्रकाश पोहरे यांना सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आयाचित यांच्या न्यायालयात आज दुपारी हजर केले.
दरम्यान, पोलिसांनी पोहरे यांची पोलीस कोठडी ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवून द्यावी, अशी न्यायालयाला विनंती केली. न्यायालयाने ही विनंती फेटाळली आणि प्रकाश पोहरे यांची न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावला.