माध्यमाच्या डोळ्यात धूळ फेकून वसूली

चंद्रपूर : राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पूत्राने सुरू केलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या येथील जिल्हाध्यक्षाने चक्क माध्यमाच्या डोळ्यात धूळ फेकून वसुलीसाठी स्वाभिमानी भूल दिल्याचा प्रकार उघड झाला आहे.  
नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासह माताभक्तांना आपले कलागुण प्रदर्शित करण्याची संधी प्रदान करण्यासाठी स्वाभिमान संघटनेने एका बड्या दैनिकाला हाती घेत १६ ते २५ ऑक्टोबर दरम्यान भव्य धमाल दांडिया उत्सव व स्पर्धेचे आयोजन केले. या कार्यक्रमाचा खर्च भागविण्यासाठी या संघटनेच्या अध्यक्षाने इतर दैनिकाची कोणतीही परवागनी न घेता पैसे वसुलीच्या रेटकॉर्डवर नावे लिहली. इतकेच नव्हेतर कार्याक्रमाला राणे परिवार सिने-नट्यासह उपस्थित राहणार असल्याचा देखावा केला. याच रेटकॉर्डवर त्यांची पानभर छायाचित्रे छापून उद्योगांकडून वसुली केली.
स्थानिक मयुर हॉटेलजवळील इंडिस्टिड्ल एरिया परिसरात आयोजित या दांडिया उत्सवात एकल, युगल, बालगट व ज्येष्ठ नागरिकांच्या समुहाची स्पर्धा घेण्यात येईल आणि स्पर्धकांसाठी विविध बक्षिसेही राहणार असून सप्तमी, अष्टमी व नवमीला विजेत्यांना आकर्षक पुरस्कार देण्याची ही योजना नागरिकांच्या दृष्टीने स्वप्नविलासी ठरली आहे. एखादी संघटना हातात पकडायची. भाड्याने माणसं आणून वेगवेगळ्या समस्यांवर निवेदने द्यायची. माध्यमांमध्ये बातम्या छापून आणायच्या आणि याच भांडवलावर  महोत्सव घेऊन वसुली करायची, असा  प्रयोग सध्या शहरात एका संघटनेने राबविला आहे. वसुलीसाठी या संघटनेच्या म्होरक्याने बेमालूमपणे माध्यमांचा वापरही त्यांच्या नकळत करण्यास मागेपुढे बघितले नाही. 
राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मोठ्या नेत्याच्या मुलाची ही संघटना आहे. या संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षाने दांडिया महोत्सवाचा अर्थपूर्ण वापर केला आहे. दांडिया महोत्सवाला प्रायोजक मिळविण्यासाठी त्याने यावेळी नवीच शक्कल लढविली. एखाद्या कार्पोरेट कंपनीलाही लाजवेल, असे माहितीपत्रक त्याने तयार केले. या माहितीपत्रकात हिंदी  सिनेसृष्टीतील किमान अर्धा डझन तारका दांडियाला उपस्थिती राहतील, असे त्यांच्या छायाचित्रांसह प्रकाशित करण्यात आले आहे. सोबतच त्या नेमक्या कोणत्या दिवशी येणार याचाही तारखेसह उल्लेख यात आहे. मात्र, आजच्या दिवसापर्यंत यातील एकही अभिनेत्री या दांडिया महोत्सवात फिरकली नाही. ज्या अभिनेत्रींचा यात उल्लेख आहे, त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक़्रमात पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. त्यांचे मानधनही लाखांच्या घरात आहे. त्यामुळे लाखोंचे बजेट असलेल्या या दांडियासाठी प्रायोजकांकडून या जिल्हाध्यक्षाने किती रक्कम उकळली असेल, याची चर्चा आता सुरू आहे. एवढ्यावरच हा स्वाभिमानी नेता थांबला नाही. संघटनेचा प्रमुख, त्याचे मंत्रिमंडळातील वडील आणि त्याचा खासदार भाऊ एकाच दिवशी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचेही या माहितीपत्रकात म्हटले आहे. त्यांची पूर्ण पान छायाचित्रेही छापली आहेत. त्यामुळे या परिवाराच्या नावावरही दांडियाच्या निमित्ताने उद्योगांकडून रक्कम वसूल केली असावी, अशीही चर्चा आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. काही प्रादेशिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांची नावे त्यांची परवानगी न घेताच या माहितीपत्रकात प्रकाशित करण्यात आली आहे. दांडियाचे रोज वृत्तांकन माध्यमांमध्ये राहील. सोबतच खासगी दूरचित्रवाहिन्यांवरही ते दाखविले जाईल, असा दावा करतानाच या माध्यमांना आम्ही जाहिराती देऊ, असा दावाही त्याने माहितीपत्रकात केला आहे. दरम्यान, काही माध्यमांनी आता त्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली आहे.