वृत्तवाहिनीच्या पत्रकारांचा कारनामा ; सेक्स टेपच्या आडून वीस लाखांची मागणी

नवी दिल्ली - देशातील दोन प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवर सेक्स टेपच्या नावाखाली एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दक्षिण दिल्लीच्या एका गॅरेज मालकाने इंडिया टीव्हीच्या पत्रकार भूमिका शर्मा आणि एबीपी न्यूजचे प्रदीप श्रीवास्तव यांनी एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल केल्याचा खटला दिल्लीतील एका कनिष्ठ न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने खटला दाखल करुन घेत, पोलिसांना  या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी पत्रकारांविरोधात गुन्हा नोंदवला असून तक्रारदार विजयकडून मिळालेल्या टेपची सत्यता पडताळून पाहाण्यासाठी, ती टेप फॉरेंन्सिक लॅबमध्ये पाठवली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार यात आणखी एक पत्रकार गुंतला असण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.