‘बेरक्या’ वर उमटतात माध्यमाच्या अंतरंगातील ‘त्या’ बातम्या - डॉ.अनिल फळे

औरंगाबाद -  ‘माध्यम समूहाचा मुख्य संपादक आणि लहान दैनिकाचा मालक-संपादक या दोघांच्याही पत्रकारितेचे स्वातंत्र्य बाजारीकरणामुळे धोक्यात आले आहे’ , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ.अनिल फळे यांनी केले.
औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ व माहिती-जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त आयोजित एका परिसंवाद ते बोलत होते. ‘प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य व जबाबदारी’  या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
    डॉ.अनिल फळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार बाबा गाडे, राजेंद्र शहापूरकर, शिवनाथ राठी, जमिल कादरी यांनी आपली मते मांडली. पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी शंकर बावस्कर यांनी आयोजिलेल्या या कार्यक्रमाला पत्रकारांची उपस्थिती होती.
नव तंत्रज्ञानाचा लाभ घेत आपले विचार व स्थानिक प्रश्नांना न्याय देण्याचे काम सुनिल ढेपे यांच्या ‘उस्मानाबाद लाईव्ह डॉट कॉम’  यासारख्या संकेतस्थळावरुन केले जाते, मंदार फणसे यांनीही मुंबईत असे संकेतस्थळ सुरु केले आहे. तहलका डॉट कॉम ने यापूर्वी मोठे उदाहरण निर्माण केले आहे. यासारख्या प्रयोग लहान दैनिकांनीही करायला पाहिजेत, अशी भूमिका मांडली. दुसरीकडे स्पर्धेच्या युगात त्या त्या समस्यांना न्याय देण्याचे काम वार्ताहर-उपसंपादक नेमकेपणाने करीत आहेत, असेही डॉ.फळे यांनी सांगितले. या पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी बिट जर्नालिझमसाठी म्हणून चौथास्तंभ हा राज्यस्तरिय विशेष पत्रकारिता पुरस्काराचा उपक्रम अप्रतिम मीडियाच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून राबविला जात आहे, याबद्दल त्यांनी माहिती दिली.
परिसंवादाच्या कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांची नगण्य उपस्थिती होती, याचा अनेकांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. तो धागा पकडत डॉ. फळे यांनी कार्पोरेट जर्नालिझम करणा-या नामवंत पत्रकारांना त्यांची मालक मंडळी सार्वजनिक कार्यक्रमापासून ते विचार व्यक्त करण्यापर्यंत अनेक प्रकारची बंधने घालतात. तर दुस-या बाजूला छोट्या दैनिकांना आर्थिक संघर्ष करावा लागल्याने निर्भिड पत्रकारितेला मर्यादा येत चालल्या आहेत यावर भाष्य केले. या संबंधी माध्यम-जगातील अंतरंग दाखविणा-या बातम्या ‘बेरक्या’  ब्लॉगस्पॉटवर उमटत असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
 तत्पूर्वी, बाबा गाडे यांनी आचार्य बाळकृष्णशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या काळात मांडलेल्या सामाजिक समस्या आजही कायम आहेत. माध्यमांनी या समस्यांकडे तितक्याच प्रखरतेने पाहण्याची गरज असल्याचे सांगितले.