अच्छा, कुठल्या पक्षाचा? - एका प्रश्नाचा पोस्ट-मॉर्टम
स्थळ: एका मोठ्या नेत्याचं चकचकीत दालन.
वेळ: 'अच्छे दिन'वाली.
पात्रं: एक उत्साही पीए, एक अनुभवी नेता आणि एक 'मोठे' पत्रकार.
पीए छाती फुगवून नेत्याला सांगतो, "साहेब, हे खूप मोठे पत्रकार आहेत!"
पत्रकाराच्या चेहऱ्यावर ज्ञानाचं आणि अनुभवाचं तेज झळकतं. देशाची, राज्याची, जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जणू त्याच्या खिशातच आहेत, अशा थाटात तो उभा असतो.
नेता त्याच्याकडे एक कटाक्ष टाकतो. डोळ्यांवरचा चष्मा नाकावर आणून, अत्यंत गंभीर आणि व्यावसायिक प्रश्न विचारतो, "अच्छा, कुठल्या पक्षाचा?"
एकेकाळी हा प्रश्न विचारला गेला असता तर मोठा अपमान समजला गेला असता. पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाला हा राजकीय तडे देणारा भूकंपाचा धक्का ठरला असता. पण आज? आज हा प्रश्न अपमान नाही, तर 'ओळखीचा' आणि 'आपुलकीचा' प्रश्न बनला आहे. नेत्याने काहीही चुकीचं विचारलं नाही, उलट त्यांनी थेट 'मुद्द्यालाच' हात घातला.
पत्रकारिता की पक्षकारिता?
पूर्वी पत्रकाराची ओळख त्याच्या वृत्तपत्रावरून किंवा चॅनलवरून व्हायची. "मी 'टाइम्स'चा वार्ताहर" किंवा "मी ' न्यूज चॅनलमधून आलोय," असं म्हटलं जायचं. आता ही ओळख जुनी झाली. आता खरी ओळख वेगळीच आहे. आता पत्रकार एकमेकांना भेटल्यावर विचारत असतील, "तुमचा पक्ष कुठला?" त्यावर उत्तर येतं, "मी सध्या सत्ताधारी पक्षातून पत्रकारिता करतोय, आधी विरोधी पक्षात होतो. पोर्टफोलिओ बदलला!"
'तटस्थ' नावाचा शब्द तर आता फक्त डिक्शनरीत सापडतो. कोणी चुकून स्वतःला 'तटस्थ' म्हटलं, तर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही त्याच्याकडे संशयाने पाहतात. "तटस्थ आहेस? म्हणजे नक्की कोणाकडून सुपारी घेतलीय ते सांग आधी!" असा त्याचा अर्थ काढला जातो.
जॉब करावा लागतो, साहेब!
एकेकाळी पत्रकारिता एक 'मिशन' होती, आता ते एक 'पोझिशन' आहे. मोठ्या मीडिया हाऊसमधला पत्रकार म्हणजे काय? तर महिन्याच्या शेवटी EMI आठवणारा, इन्क्रिमेंटसाठी बॉसला मस्का मारणारा आणि 'आजची हेडलाईन काय असावी' हे पक्षाच्या कार्यालयातून आलेल्या व्हॉट्सॲप मेसेजवरून ठरवणारा एक प्रामाणिक 'जॉबधारी'.
त्याचं काम आता बातमी देणं नाही, तर 'नॅरेटिव्ह सेट' करणं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याची शिंक आली तरी 'आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह' अशी ब्रेकिंग न्यूज चालवायची आणि आपल्या पक्षाच्या नेत्याने कितीही मोठा घोटाळा केला तरी 'मास्टरस्ट्रोक' म्हणून लोकांपर्यंत पोहोचवायचा. यालाच आजकाल 'जॉब सिक्युरिटी' म्हणतात.
नेत्यांचे पीआरओ आणि पक्षांचे भाट
आजकाल पत्रकार आणि पीआरओ यांच्यातली रेषा इतकी पुसट झाली आहे की, अनेकदा नेत्यालाही कळत नाही की आपल्या बाजूला बसलेला माणूस आपला पीए आहे की पत्रकार. दोघेही सारखंच काम करतात - नेत्याचं कौतुक!
टीव्ही डिबेट्स म्हणजे तर कुस्त्यांची दंगल. तिथे पत्रकार अँकरच्या भूमिकेत नसतो, तो स्वतः एका पक्षाचा पैलवान म्हणून उतरलेला असतो. समोरच्या पक्षाच्या प्रवक्त्याला बोलूच न देणं, आपल्या पक्षाच्या नेत्याच्या प्रत्येक वाक्यावर 'क्या बात है!' म्हणणं आणि चर्चेच्या शेवटी 'सत्यमेव जयते'च्या जागी 'आमचाच पक्ष जयते' घोषित करणं, ही त्याची मुख्य कर्तव्यं आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, नेत्याने विचारलेला "अच्छा, कुठल्या पक्षाचा?" हा प्रश्न आजच्या पत्रकारितेचं 'वास्तव' आहे. तो प्रश्न म्हणजे अपमान नाही, तर 'नोकरीचं व्हेरिफिकेशन' आहे. त्यामुळे पुढच्या वेळी कोणी मोठा पत्रकार भेटला, तर त्याला त्याच्या कामाबद्दल विचारू नका, थेट विचारा...
"साहेब, पक्ष कुठला?"
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह
0 टिप्पण्या