‘ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन’च्या अहवालावर शिक्कामोर्तब
पुणे, ता. १० : वाचकांचा अढळ विश्वास आणि विश्वासार्ह बातमीदारीच्या जोरावर ‘सकाळ’ने महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून आपले अग्रस्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ‘ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन’ने (एबीसी) जानेवारी ते जून २०२५ या कालावधीसाठी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ‘सकाळ’ने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. इतकेच नव्हे, तर देशातील सर्वाधिक खपाच्या पहिल्या दहा वृत्तपत्रांमध्ये स्थान मिळवणारे ‘सकाळ’ हे एकमेव मराठी दैनिक ठरले आहे.‘एबीसी’च्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत ‘सकाळ’चा दररोजचा सरासरी खप ११ लाख ४२ हजार ५७४ इतका प्रचंड राहिला आहे. राज्यातील इतर प्रमुख प्रतिस्पर्धी वृत्तपत्रे खपाच्या बाबतीत ‘सकाळ’च्या खूप मागे असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही मुद्रित माध्यमांवरील, विशेषतः ‘सकाळ’वरील वाचकांचा विश्वास कायम असल्याचे या यशाने दाखवून दिले आहे.
‘सकाळ’च्या या यशामागे शहरी आणि ग्रामीण भागातील मजबूत वितरण व्यवस्था, वाचकांच्या आवडीनिवडी ओळखून सादर केले जाणारे विविध विषय आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्या हे प्रमुख घटक आहेत. ‘सकाळ’तर्फे आरोग्य, महिला, युवक, विद्यार्थी आणि उद्योजक अशा विविध घटकांसाठी दररोज विशेष पुरवण्या प्रसिद्ध केल्या जातात. ‘सप्तरंग’सारख्या पुरवण्यांमधून साहित्य, राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि मनोरंजन यांसारख्या विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी केली जाते. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली ‘डोकंकोडं’ ही पुरवणी देखील सर्वच वयोगटांतील वाचकांच्या पसंतीस उतरली आहे.
सर्व माध्यमांमध्ये घोडदौड
‘सकाळ माध्यम समूहा’ने केवळ मुद्रित माध्यमातच नव्हे, तर डिजिटल आणि टेलिव्हिजन क्षेत्रातही आपली आघाडी कायम ठेवली आहे. ‘ई-सकाळ डॉट कॉम’ हे मराठीतील अव्वल संकेतस्थळ म्हणून लोकप्रिय आहे, तर ‘साम मराठी’ वृत्तवाहिनीने पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. याबरोबरच, विविध लोकप्रिय इव्हेंट्सच्या आयोजनातही ‘सकाळ’ नेहमीच अग्रेसर राहिला आहे.
महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रांचा खप
(स्रोत: एबीसी अहवाल, जाने.-जून २०२५)
सकाळ : ११,४२,५७४
लोकमत : ३,७३,३५५
लोकसत्ता : २,११,८८०
पुढारी : ५७,७८४
देशातील सर्वाधिक खपाची १० वर्तमानपत्रे
दैनिक भास्कर (हिंदी)
दैनिक जागरण (हिंदी)
टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी)
मल्याळम मनोरमा (मल्याळी)
अमर उजाला (हिंदी)
हिंदुस्तान (हिंदी)
राजस्थान पत्रिका (हिंदी)
इनाडू (तेलुगू)
डेली थंथी (तमीळ)
सकाळ (मराठी)
0 टिप्पण्या