धुळे दंगल: सहा पोलीस निलंबित,10 जणांविरूध्द गुन्हा

धुळे - शहरात ६ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीत एका पानटपरीची तोडफोड व लूटप्रकरणी १0 जणांविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात राज्य राखीव दलाचे चार जवान, दोन कमांडो, एक पत्रकार आणि दोन कॅमरामन आणि एका अज्ञाताचा समावेश आहे. यापैकी एसआरपी जवान आणि पोलिस दलातील सहा जणांना दुपारी अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या सहाही पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

 राज्य राखीव दलाचे चार जवान व दोन कमांडो यांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत रवानगी झालेल्या संशयितांमध्ये राज्य राखीव दलाचे एल.एस. सोनवणे, सी.आर. वेंधे, जी.डी. पाटील, डी.एस. सोनवणे, तर कमांडो जे.आर. पवार, वाय.आर. शिंदे यांचा समावेश आहे.
दंगलीतील छायाचित्रण पाहून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही दोषी कर्मचार्‍यांवर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह व राज्य राखीव दलाच्या अधिकार्‍यांनी त्यांची चौकशी केली.
गुन्हा दाखल असलेल्या अन्य संशयितांमध्ये व्हिडिओग्राफर व्ही.एस. सावकारे, एम.एच. खैरनार, संतोष दोरकर व एक अनोळखी यांच्या नावांचा समावेश आहे. 

याबाबत पानटपरीमालक मुख्तार अहमद अबू हसन अन्सारी यांनी तक्रार दिली होती. दंगलीदरम्यान राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी ही टपरी फोडून त्यातून काही गुटखा बाहेर काढला होता. याबाबत सुमारे दोन मिनिटांची एक व्हिडिओ क्लिप तक्रारदार अन्सारी यांनी न्यायालयात सादर केली होती.धुळे दंगलीतील व्हिडिओ क्लीप बेरक्याने निडरपणे आपल्या ब्लॉगवर प्रसिध्द केल्यामुळे तपासाची चक्रे वेगाने फिरली. 
या दरम्यान खाकी वर्दीतील सहा पोलिस आणि एक पत्रकार आणि दोन कॅमरामन एका दुकानाची तोडफोड करून सामानाची चोरी करतांना दिसले.
या मोबाईल क्लिपचा आधार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दहा जणांवर चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वांना अटक करण्यात आली आहे.
 त्याचा आधार घेत उपविभागीय अधिकारी वीरेंद्र गडकरी यांच्या तक्रारीवरून 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यात एसआरपी जवान लीलाधर शरद सोनवणे, गणेश दिलीप पाटील, सी.आर.वेंदे, डी.एस. सोनवणे, पोलिस कर्मचारी जवाहर रूपा पवार, योगेश रामलाल पवार, प्रेस कॅमेरामन व्ही.एस.सावकारे, एम.एच.खैरनार, एस.एस.दोरकर व एका अनोळखी इसमाचा समावेश आहे. तसेच इतर चौघांची नावे अद्याप स्पष्ट झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलिस दलातील सहा जणांना दुपारी अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्या सहाही पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.