गांवकरीच्या नांदेड कार्यालयावर समाजकंटकांचा हल्ला

नांदेड - नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ‘शिवसेना जि.प.गटनेत्या श्रीमती वत्सलाबाई पुयड कॉंग्रेस कोट्यात’ या मथळ्याची फोटोसह बातमी दै.गांवकरीने प्रसिध्द केल्यामुळे बालाजी पुयड यांनी फोनव्दारे धमकी दिल्यानंतर दुपारी 3 वाजता त्यांच्या समर्थकांनी गावंकरीच्या कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेकीत काचेची तोडफोड करुन 20 हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद उमाटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने तीन अधिकृत उमेदवारांची घोषणा करुन त्यांना निवडून आणण्यासाठी गटनेत्या वत्सलाबाई पुयड यांना प्रयत्न करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी पक्षाचे आदेश धुडकावून कॉंग्रेसच्या कोट्यातून ही निवडणूक लढविल्याचे सविस्तर वृत्त दै.गांवकरीने छापले होते.रविवारी सकाळी 11 वाजता वत्सलाबाई पुयड यांचे दीर बालाजी पुयड यांनी जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद उमाटे यांच्या मोबाईलवर फोन करुन ‘आमच्या विरोधात बातमी का छापली, आमच्या नादी लागणाऱ्यांना सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्यानंतर दुपारी 3 वाजता पुयड यांच्या कार्यकर्त्यांनी दै.गांवकरी कार्यालयावर दगडफेक करुन कार्यालयाच्या काचेची नासधूस करुन दहशत पसरविण्याचा प्रकार केला. या प्रकारानंतर जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद उमाटे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन हे कृत्य पुयड यांच्या समर्थकांचे असल्याचे म्हटले आहे.