मुंबई- विविध
वृत्तपत्रात काम करणाऱ्या कंत्राटी अंशकालीन बातमीदारांना शासनाने इतर
व्यवसायातील असंघटीत कामगारांप्रमाणेच असंघटीत कामगार म्हणून घोषित करावे
अशी मागणी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी शासनाकडे केली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात राज्य शासनाने २००४ च्या आदेशाद्वारे १२२ व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना असंघटीत कामगार
वर्गात समाविष्ट करून अनेक फायदे उपलब्ध केले करून दिले आहेत. या वर्गात
वृत्तपत्राचे वाटप करणारे इत्यादी कामगार असा शासनाने उल्लेख केलेला आहे.
वृत्तपत्राचा बातमीदार सुद्धा कंत्राटी तसेच अंशकालीन काम करीत असतो,
या वर्गाला नोकरीची कायमस्वरूपी हमी नसल्याने शासनाने अशा बातमीदारांना
असंघटीत कामगार वर्गात नोंद करून विविध फायदे मिळण्यास पात्र ठरवावे अशी
आग्रही मागणी पांचाळ यांनी केली आहे.
शासनाने असंघटीत कामगारांना
" जयश्री विमा योजना " लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वृत्तपत्र संस्थेत बहुतांश कंत्राटी, अंशकालीन पद्धत असल्यामुळे अशा
बातमीदारांना कायमस्वरुपाच्या कामाची हमी नसते. यामुळे वृत्तपत्रात काम
करणारे बातमीदार तसेच सर्व कुशल अकुशल अशा कामगारांना जयश्री विमा योजनेचा लाभ मिळावा अशी मागणीही शासनाकडे केली आहे.
मागण्या मान्य करू - कामगार राज्यमंत्री गावित
जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या शिष्टमंडळाने महारा ष्ट्र राज्य अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावित यांची भेट घेवून बातमीदारांना असंघटीत कामगार वर्गात नोंद करण्याची तसेच "
जयश्री विमा योजना " लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत संघटनेची मागणी
रास्त असून आपण शासनाकडे या मागण्यांचा पाठपूरावा करून मागण्या मान्य करू
असे कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी सांगितले आहे.