सकाळच्या छायाचित्रकारामुळे बैलाला मिळाले जीवनदान

कोल्हापूर - दिवसभर उसाची गाडी ओढून दमलेल्या बैलाने गाडी ओढतच रस्याकडेलाच अंग टाकले; पण व्यावसायिकता पुरेपूर भिनलेल्या व ज्याच्या जिवावर दररोजची भाकरी खाणाऱ्या "मानवी वृत्ती'ने ही बाब अगदीच सहज घेतली. या बैलाला तसेच टाकून या वृत्तीने आपले इच्छित स्थळ गाठले; पण मरणकळा अनुभवणाऱ्या या बैलाला सकाळचे छायाचित्रकार बी. डी. चेचर यांच्या प्रयत्नांनी वैद्यकीय मदत मिळाली.

कोल्हापूरजवळील पंचगंगा नदीजवळील शियेपुलानजीक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चरीमध्ये हा बैल निपचित पडलेला दिसला. जवळून जाणारे अनेक दुचाकीस्वार गाडीचा वेग काहीसा कमी करत ते पाहत होते..."अरे जिवंत आहे की रे...' असे पुटपुटत या दुचाकी पुढे जात होत्या. त्या बैलाचे डोळेच त्याच्या जिवंतपणाची साक्ष देत होते. मागून ऊस भरून येणाऱ्या काही बैलगाडीमालकांशी संवाद साधला असता, "बैल जिवंत आहे, त्याला उठवू या...' असे म्हणताच या ऊसतोडणी मजुरांनी याला स्पष्ट नकार दिला. "आता ते जनावरं जगत नाही... कशाला त्याच्या नादाला लागा..' असे म्हणत मजुरांनी पुढचा रस्ता धरला.

महापालिका तसेच अशा जनावरांचे संगोपन करणाऱ्या संस्था प्रतिनिधींशीही संपर्क केला; पण प्रतिसाद "शून्य'. काही वेळानंतर पुन्हा घटनास्थळी धाव घेतली असता मानवतेची आणखीन एक क्रूरता दिसली. हा बैल उपयोगाचा नाही म्हटल्यावर त्याच्यावर इलाज न करता तो कसायालाच विकण्याचा डाव त्या बैलमालकांकडून सुरू होता. त्यानतंर जीवन मुक्ती संघटनेशी संपर्क साधला असता संघटनेचे प्रमुख अशोक रोकडे घटनास्थळी पोचले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठले. संबंधित बैलमालकाने हा बैल कसायाला विकण्याआधीच त्याला कारखान्याकडे उपचारासाठी रवाना केले
... आणि तो उभा राहिला कारखाना परिसरात ठेवण्यात आलेल्या बैलाची तब्येत आज सुधारली आहे. आज सकाळी त्याच्या मालकाने "हर्ऱ्या' करत त्याला इशारा केला. बैल जागेवर उठून उभा राहिला. अंकुशच्या पत्नीने वाड्याची चार पाने बैलाच्या तोंडापुढे केली. बैलाने ती चघळली. बैलाला अजूनही थोडा प्रभावी उपचार मिळाला तर बैल निश्‍चित वापरात येईल, असे अंकुश म्हणतो.