पत्रकारांसाठी किमान शैक्षणिक अर्हता असावी : काटजू

नवी दिल्ली : पत्रकारासाठी किमान शैक्षणिक अर्हतेची अट नसल्यामुळे पत्रकारितेचा दर्जा खालावत असल्याचं मत प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केलंय. पत्रकारांसाठी किमान शैक्षणिक अर्हता काय असावी आणि त्यामध्ये एकवाक्यता कशी आणता येईल, यावर अहवाल देण्यासाठी मार्कंडेय काटजू यांनी एका कमिटीचीही स्थापना केलीय.

निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी स्थापन केलेल्या या त्रिसदस्यीय कमिटीमध्ये प्रेस कौन्सिलचे सदस्य असलेले श्रवण गर्ग आणि राजीव साबडे तसंच पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील असोसिएट प्रोफेसर उज्वला बर्वे यांचा समावेश आहे. 

मार्कंडेय काटजू यांनी आज एक पत्रक जारी करून ही भूमिका मांडलीय. त्यामध्ये त्यांनी पत्रकारितेसारख्या महत्वाच्या आणि लोकांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या क्षेत्रातील करीअरसाठी काहीतरी किमान शैक्षणिक अर्हता असण्याची आवश्यकता असायला हवी, अशी मांडणी केलीय.

आपली बाजू सविस्तरपणे मांडताना काटजू यांनी वकील आणि डॉक्टर या व्यावसायिकाचं उदाहरण दिलंय. वकिलांना एलएलबीची पदवी आणि बार कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक असते, तसंच डॉक्टरांनाही एमबीबीएसची पदवी आणि मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी अनिववार्य असते. शिक्षकांनाही डीएड, बीएड अशी शिक्षणशास्त्रातली पदवी किंवा पदविका आवश्यक असते, तशी शैक्षमिक अर्हता पत्रकारांसाठीही असायला हवी. सध्या पत्रकारितेचं डिप्लोमा किंवा डिग्रीपर्यंत शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्यामध्ये अनेक पत्रकार आपला अभ्यासक्रम पूर्णही करतात, मात्र नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसायासाठी पत्रकारितेतील पदवी किंवा पदविका अनिवार्य अशी अट नसते. त्यामुळे कुणीही पत्रकारितेचा व्यवसाय करू शकतो. त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात किंवा होत आहेत, असं सांगून काटजू यांनी सध्या कुणीही अल्पशिक्षित किंवा अपुऱ्या व्यावसायिक ज्ञानावर या क्षेत्रात प्रवेश घेतलेल्यांमुळे पत्रकारितेचा दर्जा खालावण्याबरोबरच त्याचं गांभीर्य कमी होत असल्याची खंत व्यक्त केलीय.  

पत्रकारितेतील पात्रता निश्चित करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती
नवी दिल्ली : पत्रकारितेत येण्यासाठी कायद्याने बंधनकारक असलेली पात्रता निश्चित करायला हवी, अशी भूमिका प्रेस कौंसिल ऑफ इंडियाने मांडली आहे.
प्रेस कौंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी हीच पात्रता निश्चित करण्यासाठी एका त्रिसदस्यीय समितीची नेमणूकही केली आहे.

डॉक्टर, वकील अशा कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या त्या क्षेत्राची पदवी घेणं आवश्यक आहे.

मात्र पत्रकार होण्यासाठी अशी कोणतीही पदवी कायद्याने बंधनकारक नाही. पत्रकारितेचा समाजावर मोठा परिणाम होतो, त्यामुळे प्रशिक्षित नसलेले लोक या क्षेत्रात येतात तेव्हा त्याचा परिणाम पत्रकारितेवर होतो असा काटजूंचा दावा आहे.

काटजूंनी नेमलेली त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द करेल, तो अहवाल प्रेस कौंसिल ऑफ इंडियाच्या सर्व सदस्यांसमोर ठेवला जाईल आणि मान्यता मिळाल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकारकडे पाठवण्यात येईल.

 
साभार - ABP माझाजाता- जाता बेरक्याचे सवाल
- मराठवाडाचे दिवंगत संपादक अनंतराव भालेराव, संचारचे दिवंगत संपादक रंगाआण्णा वैद्य कोणत्या कॉलेजमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते, तेच शेवटचे आदर्श संपादक ठरले.
- सध्याच्या किती संपादकांनी पत्रकारितेचा कोर्स केला आहे ?
-या उलट किती तरी विद्याथ्र्यांनी पत्रकारितेचा कोर्स केला आहे, मात्र चार ओळी नीट लिहिता येत नाहीत.
-स्वत: काटजू कोणत्या पेपरचे पत्रकार होते ? ते न्यायाधिश होते, पत्रकार नव्हते.मात्र पत्रकारांना उपदेशाचे डोस देत आहेत.
- पत्रकाराला अनुभव महत्वाचा आहे. त्याच्या अंगात संवेदनशिलपणा पाहिजे.बातमी दगडात,धोंड्यात,फळात आहे, फक्त दृष्टी पाहिजे.तो स्वत:चा गुरू स्वत:च आहे.त्यामुळे माझ्या मते पत्रकारांना लिहिता,वाचता आले तरी बस्स आहे.
-ग्रामीण भागात बी.जे.केलेले किती विद्यार्थी सापडतात. जे करतात, ते शहराकडे जातात. मग ग्रामीण भागात कोर्स केलेले पत्रकार आणायचे कोठून ?