परभणी- पत्रकारांना संरक्षण
देणारा कायदा तयार करावा, या मागणीसह पूर्णा आणि गंगाखेड येथील पत्रकारांवर
झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी १६ मार्च रोजी पत्रकारांचा
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात मराठवाड्यातून पत्रकार
मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख आणि किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकातून दुपारी१ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान पत्रकार हल्लाविरोधी कायदा झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे अनेक पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त करुन पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा व्हावा, यासाठी आग्रह धरला. त्यांनतर जिल्हाधिकारी डॉ.शालीग्राम वानखेडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये अब्दुल हफीज (जालना), जयप्रकाश दगडे (लातूर), केशव घोणसे पाटील (नांदेड) तसेच अ.भा. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन धूत, बहुभाषिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप माने यांच्यासह परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून आलेले पत्रकार सहभागी झाले होते. तत्पूर्वी सकाळी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीने एस.एम. देशमुख व पत्रकारांनी पालकमंत्री प्रकाश सोळंके यांची भेट घेतली. यावेळी पूर्णा व गंगाखेड येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची माहिती देत पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा तयार करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. |