वागळे हिरो होवू नये म्हणून खांडेकरवरही हक्कभंग....

ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यावरही विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. खांडेकर एक शांत आणि संयमी संपादक म्हणून परिचित असताना, आमदारांना ते असे काय बोलले की, त्यांच्याविरूध्द हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला.
आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे वाचाळ आहेत, हे सर्वांना माहित आहे.कोणावरही काही आरोप करतात, ते लोकांचे न ऐकता स्वत:ची बडबड सुरू ठेवतात, हे सर्वांना माहित आहेत, मात्र खांडेकरचे नाव वागळेबरोबर जोडले गेल्याने महाराष्ट्रातील मीडियाही बुचकळ्यात पडला आहे.

नाहीतर वागळे हिरो ठरले असते...

वागळेंना माणसे अंगावर घेण्याची सवय आहे. काही झाले तरी चॅनलपेक्षा स्वत:चे नाव गाजले पाहिजे हा त्यांचा मनसुबा असतो. म्हणूनच ते स्वत:ला फोकस करीत असतात. आमदारांविरोधात आरोप केल्यानंतर विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल होणार, हे त्यांना माहित होते.मात्र त्यांचा हा डाव आमदारांनीही उधळून लावला आहे.
एकट्या वागळेवर हक्कभंग प्रस्ताव झाला झाला असता, तर वागळे हिरो ठरले असते, म्हणून राजीव खांडेकरचे नावही गोवण्यात आले,अशी चर्चा आहे.

पत्रकार संरक्षण कायदा चुलीत

वागळे आणि खांडेकर यांच्यावरील हक्कभंग प्रस्ताव विधीमंडळात गाजल्यामुळे पत्रकार संरक्षण कायदा आता चुलीत गेला आहे. कायदा नाही तर पत्रकार असे काही बोलतात, उद्या कायदा झाला तर पत्रकार कसे वागतील,असे आमदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा कायदा होण्याची शक्यता दुरावत चालली आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या कायद्यासाठी जो लढा देत होती, ती मेहनत यानिमित्त वाया गेली आहे.

पाहुण्यांच्या हस्ते साप मारला

ABP माझावरील चर्चेत भाई जगताप नेहमीच भाग घेत असतात. मात्र त्यांनीच विधान परिषदेत राजीव खांडेकर यांच्याविरूध्द हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. हे ऐकूण अनेकांना आश्चर्य वाटले असेल,मात्र आमदारांनी पाहुण्यांच्या हस्ते साप मारून, खांडेकरांना जोरदार झटका दिला आहे.


जाता - जाता : 
1. राज्यातील पत्रकारांत राजीव खांडेकर यांच्याबाबत सहानुभूती आहे, मात्र वागळेबाबत नाहीत.त्यामुळे हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याचा निषेध करावा की, नाही याबाबत अनेक पत्रकार संभ्रमात पडले.
2. कडा, धारूर आदी छोट्या तालुक्यातील पत्रकार संघाची बातमी आजपर्यंत कधी चॅनलवर आली नाही, मात्र निषेधाच्या निमित्ताने त्यांचे नाव चॅनलवर आले.ऐवढेच काय औरंगाबाद जिल्हा पत्रकार संघाची बातमीही कधी चॅलनवर आली नव्हती, ती यानिमित्त आली.म्हणतात ना,अब आया ऊंट पहाड के निचे... 
3. हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता पुढे काय होणार,याकडे लक्ष वेधले आहे.
- वागळे माफी मागणार नाहीत, कारण त्यांची जेलमध्ये जाण्याची तयारी आहे.पुर्वीही ते बऱ्याच वेळा गेले आहेत.
-याउलट खांडकर माफी मागून मोकळे होतील. कारण खांडेकरांची जेलमध्ये जाण्याची इच्छा नाही.