मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, गृहनिर्माण राज्य मंत्री सचिन अहिर, उद्योगमंत्री नारायण राणे, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, खासदार गोपीनाथ मुंडे, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, बीसीसीआयचे राजीव शुक्ला अशा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी व्यासपीठावरुन ‘जय महाराष्ट्र’ चॅनल लॉन्च केलं. या सगळ्यांच्याच हातात रिमोट देण्यात आला होता आणि स्टेजवर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनसमोर रिमोट कंट्रोल धरून त्यांनी ऑनचं बटण क्लिक केलं….उपस्थित प्रेक्षक काही क्षणासाठी स्तब्ध झाले…काऊंटडाऊन सुरू झाला…आणि ‘जय महाराष्ट्र’ चा प्रोमो स्टेजवर लावलेल्या स्क्रीनवर प्ले झाला…. आम्ही अचूक असू, थेट आणि बिनधास्त…हे असेल सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारं चॅनल…..प्रोमो संपला आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला…उपस्थितांच्या चेह-यावर कुतूहल, आश्चर्य आणि कौतुक सहज लक्षात येत होतं…फक्त राजकीय़ नेत्यांची मांदियाळी नव्हे तर अख्ख बॉलिवूडही या लॉन्चिंग पार्टीला अवतरलं होतं. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र, अभिनेता ओम पुरी, भाग्यश्री पटवर्धन, मल्लिका शेरावत, संगीतकार जोडी साजिद-वाजिद आणि बॉलिवूडमधली दोन ग्रेट नावं स्टार प्रियांका चोप्रा आणि द सलमान खान यांचीही या लॉन्चिंग पार्टीला उपस्थिती होती. अशा सगळ्या दिग्गजांनी ‘जय महाराष्ट्र’च्या लॉन्चिंगला येणं ही ‘जय महाराष्ट्र’ चॅनलच्या दमदार एन्ट्रीची नांदी म्हणावी लागेल.
अभिनेता सलमान खान याचं स्वागत करताना ‘जय महाराष्ट्र’
न्यूज चॅनलचे संपादकीय सल्लागार संचालक वाहिद अली खान.
कर्नाटकातून आलेल्या एका युवकाचा, आयुष्यात काहीतरी करु पहाणारा तरुण ते बिल्डर आणि सहाना ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन असा शुन्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास थक्क करणारा…ते नाव सुधाकर शेट्टी…त्यांचे सगळ्याच क्षेत्रातल्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, त्यामुळे हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. त्यांच्या याच सगळ्या गुणसमुच्चयाचा उल्लेख मान्यवरांच्या भाषणातूनही दिसून आला. “ज्या महाराष्ट्राने मला मोठं केलं, त्याचे ऋण मनात ठेऊन हे मराठी चॅनल मी सुरू केल्याची” भावना स्वतः सुधाकर शेट्टी यांनी व्यक्त केली…सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे, दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन सगळेच चॅनल करतात. पण आपल्या ‘जय महाराष्ट्र’ या चॅनलच्या लॉन्चिंगलाच श्री. सुधाकर
शेट्टी यांनी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून एक कोटींचा धनादेश मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. यातून सुधाकर शेट्टी यांचं
सामाजिक भान जाणवतं. यासगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी संपादकीय सल्लागार संचालक वाहिद अली खान यांनी उत्कृष्टपणे निभावली.न्यूज चॅनलचे संपादकीय सल्लागार संचालक वाहिद अली खान.
तसंच या लॉन्चिंगच्या सुरुवातीलाच ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनलचे संपादक मंदार फणसे, कार्यकारी संपादक रवींद्र आंबेकर आणि तुळशीदास भोईटे यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं आणि संपादकांनी जय महाराष्ट्र या चॅनलची भूमिका मांडली. महाराष्ट्राचं हित आणि सामाजिक बांधिलकी जपण्याला प्राधान्य देणारं हे चॅनल एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे…..