संजीव उन्हाळे यांना वरुणराज भिडे पुरस्कार

■ पुणे येथे रविवारी वरुणराज भिडे स्मृती मुख्य पुरस्कार स्वीकारताना संजीव उन्हाळे.
 पुणे - पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाचा वरुणराज भिडे स्मृती मुख्य पुरस्कार आज 'लोकमत'च्या औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व २१ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विरोधी पक्षनेते विनोद तावडे व 'लोकमत'च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.
लोकशाहीची धुरा सांभाळणारे कायदेमंडळ, न्यायालये, प्रशासन आणि पत्रकारिता हे चारही स्तंभ आपली भूमिका काय, याविषयीच संभ्रमात पडल्याचे दिसत आहे. एक आपली भूमिका पार पाडू शकत नाही म्हणून दुसरा ती हातात घेतो आणि अपूर्ण माहितीत घोळ अधिक वाढतो. लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये नकारात्मक वातावरण असले तरी त्यात चुकीचे आहे, असे म्हणणारेही आहेत. जेव्हा चूक आहे असे जाणवते तेव्हाच चांगले होण्याची आशा असते. असे चांगले करणार्‍यांचे आत्मबल वाढविण्याची जबाबदारी पत्रकारांची असून विश्‍वासाचा माहोल चारही स्तंभांभोवती उभा रहायला हवा, असे मत तावडे यांनी व्यक्त केले. अशोक तुपे, आरती कदम, नीलेश खरे, नंदकिशोर लोंढे, संदीप पोळ यांनाही विविध पुरस्कार देण्यात आले.