आजपर्यंत
मुंबईपुरताच राहिलेल्या मटाने गेल्या काही वर्षांपासून नवनवीन आवृत्त्या सुरू करून
आपला विस्तार केला आहे. त्यामुळे एकेकाळी खरोखरच दर्जेदार वृत्तपत्र असलेला मटा
आता आपल्या शहरातूनही सुरू होत असल्याचे पाहून मराठी मनाला आनंद झाला होता. पण रोजरोज
सेलिब्रिटींचे मोठेमोटे फोटो, आंग्रेजाळलेली मराठी, तरुणाईच्या नावावर काहीही
खपविणे हे पाहून प्रत्यक्षात त्यांच्या किती अपेक्षा पूर्ण झाल्या हे त्यांनाच माहीत.
मुंबईबाहेर पहिली मोठी आवृत्ती सुरू झाली पुण्यात. त्यावेळी विविध
पदांसाठी भरती करण्यात आली. त्यात खरच दर्जेदार काम करणा-या पत्रकारांना आशा वाटली
की, आपल्याला मटात (टाईम्ससारख्या प्रतिष्ठीत समूहात) काम करायला मिळेल. मुंबईचा
मटा वाचून माहीत असलेल्या वाचकांनाही वाटले काही तरी दर्जेदार वाचायला मिळेल. पण
घडते आहे वेगळेच. सुरुवातीला प्रस्थापित अशा एकाच वृत्तपत्रातील अधिकाधिक
कर्मचा-यांना जादा पगार देऊन आपल्याकडे खेचले गेले. त्यावेळी समाजाच्या दृष्टीने
आवश्यक अशी खरीखुरी मराठी पत्रकारिता करणाऱ्यांपेक्षा वशिला, लाळघोटेपणा करू शकणाऱ्यांनाच
महत्त्व दिले गेले. कारण सध्या या वैशिष्ट्यांची मराठीत चलती आहे. अन्य
वृत्तपत्रात दर्जेदार काम करणाऱ्या पत्रकारांना फारसे महत्त्व देण्यात आले नाही.
यामागे विचार एकच प्रस्थापितावर मात करणे. अन्य आवृत्त्यांसाठी पुण्यात भरती झाली
त्याहीवेळी एवढाच निकष आणि विचार. त्यामुळे नव्या आणि जुन्या वृत्तपत्राची शैली,
फोटोही सेमसेम. आगळ्यावेगळ्या स्कीममुळे अंकाचा खप सुरुवातीपासूनच जास्त असला तरी
वाचक असेही म्हणू लागले की नवे वृत्तपत्र जुन्याचीच कॉपी आहे. मटात जी भरती झाली
त्यातील ब-याच जणांची रितच न्यारी. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संरक्षण अशा
प्रकारच्या विषयांवर `प्रभुत्व’ असलेल्यांची संख्या सर्वाधिक. वरच्यांना खूष
करण्यासाठी आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी त्यांनी आपली क्षमता नसली तरी त्यावर लेखन
करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर मटात अशीही पध्दत आली की, या विषयांवर तुम्हाला
काही माहीत असो वा नसो, कोणीही लिहावे.
मग काय व्हायचे तेच होऊ लागले. होणारच अक्षम लोकांचाच भरणा आहे ना
त्यात. या विषयांवर लेखन करण्यासाठी मटात प्रचंड चढाओढ होऊ लागली आहे. त्यांच्यातील
ब-याच जणांनी आगळीवेगळी पध्दत अवलंबली आहे. माहितीचा प्रचंड खजिना असलेल्या
इंटरनेटवरून या विषयांशी संबंधित नामांकित संस्थांच्या साईटवरून एखाद्याचा अभ्यासपूर्ण
लेख उचलायचा. त्याचे मराठीत भाषांतर करायचे आणि तो आपल्या नावावर खपवायचा. मात्र
त्यांची ही चाल सुजाण वाचकांच्या नजरेत आली. २४ एप्रिलच्या चीनसंबंधीच्या मटा
गाईडमध्येही चुकांचाच भडीमार. हे कमी म्हणून की काय रोजच्या अंकात शुध्दलेखनाच्या
चुकाच चुका. बातम्यांमध्येही चुका. विनोदी किस्स्यांचेही रिपीटिशन.
या वर्णनामागे
अपेक्षा एवढीच की स्पर्धक वृत्तपत्रातूनच पत्रकारांना स्वतःकडे ओढत बसण्यापेक्षा
पत्रकारांच्या दर्जाला सर्वाधिक महत्त्व दिल्यास मराठी पत्रकारितेचे भवितव्य
उज्ज्वल बनेल. त्यासाठी मीच शहाणा, मला सगळं येतं या वृत्तीतूनही बाहेर येणं
अत्यंत आवश्यक आहे. पण त्यालाच आज सर्वांत आधी तिलांजली दिली जात आहे. राज्य आणि
गल्लीतल्या राजकारणावर ठोकळेबाजपणे रेकून लिहिता-बोलता आले की मराठी पत्रकारितेत कोणीही
नवशिकाही आंतरराष्ट्रीय घजामोडींचाही तज्ञ बनतो आहे. त्यामुळे ज्या विषयांमध्ये
खरोखरच तज्ञता लागते, त्यावरही ते अधिकारवाणीने बोलू लागतो. इलेक्ट्रॉनिक मीडियात
हे सर्रास घडते आणि ते प्रिंटमध्येही घडत आहे. मराठी पत्रकारांच्या मते तर, या
विषयांमध्ये मराठी माणसाला फार इंटरेस्ट नसल्याने त्यासाठीच्या माहितगारांची गरज
नाही. हे विषय शक्यतो टाळण्याकडेच वरिष्ठांचा कल असतो.
अलीकडेच सुरू
झालेल्या टीव्ही नाईननेही असाच काही प्रकार केला. चित्त्याचा जीवनपट दाखवून जरा
वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न त्याने केला. पण अर्ध्या तासाच्या विशेष
कार्यक्रमात आपण चित्ता सोडून वेगळाच प्राणी दाखवत आहोत हे त्यांना समजले नाही. चित्ता
भारतात नाही हे कदाचित त्यांच्या हुशार तज्ञ पत्रकारांना कदाचित माहीत नाही.
चित्ता झाडावर चढत नाही हेही ते विसरले आणि चक्क बिबट्यालाच चित्ता ठरवून वेळ
मारून नेली.