लोकमतचे सतिश सुदामे यांचे निधन

औरंगाबाद - लोकमतचे मुख्य उपसंपादक सतिश सुदामे (वय ५७ ) यांचे रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल लोकमत परिवारातील अनेकांनी शोक प्रकट केला आहे.लोकमतला गेल्या सहा महिन्यातील हा दुसरा धक्का आहे.
सुदामे शहरातील कांचननगर भागात राहतात.शनिवारी घराच्या गच्चीवर चढून,आंब्याची कैरी तोडत असताना, तोल जावून ते २५ फूट खाली जमिनीवर कोसळले होते.या दुर्घटनेत त्यांचे हात - पाय फॅक्चर होवून,डोक्यासही मार लागला होता. त्यांना उपचारासाठी एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.उपचार चालू असतानाच,रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
सुदामे गेल्या २५ वर्षापासून लोकमतमध्ये होते.त्यापूर्वी पाच वर्षे मराठवाडा आणि लोकविजय दैनिकात होते.पत्रकारितेच्या ३० वर्षाच्या कारकिर्दपैकी २५ वर्षे त्यांनी लोकमतमध्ये घालविली.मुंबई,जालना आणि औरंगाबाद येथे त्यांनी काम केले.त्यांचा स्वभाव मनमिळावू होता.सुदामे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली (एक विवाहित), एक मुलगा आहे.
'लोकमत'मधील सेवेची २५ वर्षे त्यांनी नुकतीच पूर्ण केली होती. 'लोकमत'च्या औरंगाबाद व मुंबई आवृत्तीत त्यांनी विविध पदांवर काम केले. जालन्याचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी विशेष ठसा उमटविला होता. 'देई बा विठ्ठला' या त्यांनी लिहिलेल्या अभंगवाणीला ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी स्वरसाज चढविला होता. उर्दू शायरी, गजल हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांचा 'मौसम' हा गजल संग्रहही प्रसिद्ध झाला आहे.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दर्डा यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. खा. चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकसभेचे सूत्रसंचालन नंदकुमार घोडेले यांनी केले. 
सहा महिन्यापुर्वी लोकमतचे उपसंपादक विलास इनामदार यांचे रेल्वे अपघातात निधन झाले होते.सुदामे यांचेही अपघाती निधन झाल्याने लोकमतला दुसरा धक्का बसला आहे.
कै.सतिश सुदामे यांना भावपुर्ण श्रध्दांजली....  
............................................................

मनाला चुटपूट लावणारे इनामदार आणि सुदामे....
 

गेल्या सहा महिन्यात लोकमतची दोन माणसे अपघातात गेली.एक विलास इनामदार आणि दुसरे सतिश सुदामे.दोघांचाही मृत्यू मनाला चुटपूट लावणारा आहे.
सहा महिन्यापुर्वी इनामदार तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते.रेल्वेने येताना एका ठिकाणी रेल्वे थांबली. रेल्वे थांबली म्हणून इनामदार पाणी आणण्यासाठी खाली उतरले आणि रेल्वे सुरू झाली.रेल्वे सुरू झाल्यानंतर इनामदार पळत जावून रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला आणि पाय निसटून ते खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी सतिश सुदामे यांचाही अपघाती मृत्यू झाला.शनिवारी घराच्या गच्चीवर उभे राहून आंब्याची कैरी तोडत असताना, ते 25 फुट खाली पडले आणि गंभीर जखमी होवून रविवारी त्यांचा मृत्यू झाला.
इनामदार हे लोकमतमध्ये उपसंपादक तर सुदामे मुख्य उपसंपादक होते.दोघेही मनमिळावू स्वभावाचे. कोणाच्या फंदात न पडणारे. आपण भले आणि आपले काम भले म्हणणारे. त्यामुळे दोघांचा मृत्यू मनाला चुटपूट लावणारा आहे.
इनामदार पाणी आणण्यासाठी खाली उतरले नसते तर....सुदामे कैरी तोडायला गेले नसते तर...पण अश्या जर-तरच्या प्रश्नांना नियतीपुढे उत्तरे नसतात.मृत्यू केव्हा आणि कधी येईल हे सांगता येत नाही.
हे दोघे आमच्यात नसले तरी आमच्या सतत स्मरणात राहतील.