सुधाकरी जय महाराष्ट्र

‘जय महाराष्ट्र’ नावाचं मराठी चॅनेल महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू झालं आहे. कुठलंही चॅनेल सुरू होत असताना त्याचा जसा गाजावाजा होतो तसा या चॅनेलचाही झाला आहे. मात्र या चॅनेलचा गाजावाजा काहीसा टीकात्मक पद्धतीचा आहे. या चॅनेलची जुळवाजुळव सुरू असतानाच त्याबाबत चर्चा सुरू होती ती त्याच्या मालकाची. या चॅनेलचा मालक सुधाकर शेट्टी याच्यावर इंडियन एक्स्प्रेसने प्रकाश टाकला आणि हा विषय चव्हाट्यावर आला. बार, बांधकाम आणि मीडिया असा प्रवास करणार्या सुधाकर शेट्टी याचं कर्तृत्व तसं सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या. मीडिया कुणाच्या हातात जातोय याचीही गंभीर चर्चा सुरू आहे. ‘एकच प्याला’ मधील सुधाकर सगळ्यांनाच माहीत आहे, या सुधाकराने मात्र भल्याभल्या माणसांना आपल्या नादी लावलं आहे.
भारतात २४ तास बातम्यांचा रतीब देणार्या चॅनेलच्या संख्येत वाढ होतेय. भाषिक चॅनेलची संख्या वाढतेय. दक्षिणेत एकेका भाषेत ८ ते १० चॅनेल आहेत. मराठीतही आता कुठे चॅनेलची स्पर्धा सुरू झाली आहे. एका बाजूला गल्लोगल्ली, जिल्हा, तालुका पातळीवर वर्तमानपत्र नियतकालिकं निघतायत. या माध्यमांची ताकद ओळखून
ज्याला पत्रकारिता कशाशी खातात ते कळत नाही अशी माणसंही माध्यम मालक बनतायत. यातून लोकशाहीचा स्तंभ मजबूत होतोय म्हणायचं की त्याला सुरूंग लागतोय म्हणायचं, हा सवाल. ज्यांच्या हाती (कोणत्याही मार्गाने मिळवलेला) पैसा आहे तो जमेल तसं माध्यम आपल्या दावणीला बांधतोय. प्रमुख राजकारण्यांचा तर आपला स्वतःचा मीडिया आहे. बिल्डर आता मागे नाहीत. त्यांनीही माध्यमांत आपली गुंतवणूक चालवली आहे. खरं तर यात वावगं असं काही नाही. आता तो बिझिनेस आहे. नियमानुसार कुणालाही माध्यम सुरू करता येतं. मात्र त्याचा हेतू काय, कुणाचं हित जोपासलं जाणार, एवढाच कळीचा आणि मुळातला मुद्दा आहे. सेटर लोक कुणाचे पैसे कशात गुंतवतील याचा नेम नसतो. याचा वाईट परिणाम मीडियातील लोकांवर होऊ लागला याचं विदारक वास्तव ‘झी’- जिंदाल प्रकरणाने आपल्यापुढे आहेच.
सुधाकर शेट्टी याच्यासारखा बदनाम माणूस चॅनेल सुरू करणार ही बातमी सगळ्यांनाच धक्का देणारी असणं स्वाभाविक आहे. सुधाकर शेट्टी याच्या आधीच्या धंद्यांबाबत पुन्हा एकदा उजळणी करण्याची इथे गरज वाटत नाही. कुठलाही विधीनिषेध नसणारा असा हा बारवाला, सगळी अनैतिक कामं, गुन्हेगारी कृत्याचे आरोप त्याच्यावर आहेत. थेट दाऊदच्या लोकांसोबत त्याचं नाव जोडलेलं आहे. त्याने गेल्या काही दिवसांत जी काही मजल मारली आहे ती सगळ्यांनाच त्याच्यापुढे झुकायला लावणारी आहे. मुंबईतला सगळ्यात मोठा बिल्डर अशी त्याची ख्याती आहे. कुणाकुणाचा पैसा त्याच्याकडे आहे याची चर्चा सगळीकडेच होत होती मात्र त्याच्या नव्या चॅनेलच्या लाँचिंग पार्टीत जे नेत्याचं भूमंडल जमलं होतं त्याने त्यावर शिक्कामोर्तब केलं. मुख्यमंत्र्यांसह केंद्र-राज्यातील भले जाणते मंत्री, संत्री, पदाधिकारी यात हजर होते. धक्कादायक असा हा सगळा प्रकार होता.
‘जय महाराष्ट्र’ या चॅनेलचं उद्घाटन गँ्रड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालं. एखाद्या चॅनेलचा कार्यक्रम इतका लज्जास्पद आजवर झाला नसावा. मुळात या कार्यक्रमाची जाहिरात केली होती ती बॉलिवूड सितार्यांच्या रंगारंग कार्यक्रमाची. शरद पवार तिथे आले तेव्हा प्रियांका चोप्राची रिहर्सल सुरू होती. सगळा रागरंग पाहून आम्ही गेल्यावर काय तो कार्यक्रम करा, असं पवारांनी सुधाकर शेट्टीला सांगितल्याचं समजतं. बराच वेळ सर्व नेते पहिल्या रांगेत बसून होते. मग ‘जय महाराष्ट्र’ म्हणत श्रेयस तळपदे आणि अमृता पत्की या दोघांनी हिंदीतून सर्व कार्यक्रमात धिंगाणा घातला. कशाचा कशाला ताळमेळ नव्हता. कुणी कुठे बसायचं, कसं स्वागत करायचं यात सावळागोंधळ होता. चॅनेलच्या ऐन उद्घाटनाच्या वेळी तर तांत्रिक बिघाडही अक्षम्य होता. खरं तर हे चॅनेल ज्यांच्या खांद्यावर आहे त्या संपादकांना उद्घाटनाच्यावेळी मंचावर बोलावलं गेलं नाही. या प्रकाराने तिथे उपस्थित असलेले सगळेच पत्रकार आश्चर्यचकित झाले होते. हे असं का झालं असेल? कारण या कार्यक्रमात चॅनेलच्या उद्घाटनापेक्षा भर होता तो सुधाकर शेट्टी याच्या इमेजला प्रतिष्ठा देण्याचा.
‘जय महाराष्ट्र’ हे चॅनेलचं नाव सोडलं तर या कार्यक्रमात मराठीपणाचा लवलेशही नव्हता. कार्यक्रमासाठी आलेल्या बहुसंख्य माणसांना चॅनेलशी काही देणंघेणं नव्हतं. सहपरिवार मंचावर मिरवणार्या, मोडक्या हिंदीत बोलणार्या सुधाकर शेट्टीसाठीच ते टाळ्या वाजवत होते. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या राजकीय नेत्यांत मग सुधाकरगौरवाची जणू नशाच आली होती. महाराष्ट्रात आता सुधाकर शेट्टी नावाचा माणूस किती महत्त्वाचा आणि महाराष्ट्राच्या भल्याचा आहे याचं अश्लाघ्य गुणगान या नेत्यांनी गायलं. अर्थात या मागे अनेकांची अनेक गणितं आहेत. काही असो, या सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यातल्या एकाही नेत्याने या चॅनेलचे संपादक वा कार्यकारी संपादक यांचा उल्लेख करून त्यांना साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत, सगळे सुधाकर प्रेमात टुन्न झाले होते.
खरं तर या कार्यक्रमात ‘जय महाराष्ट्र’ चॅनेलचे संपादक मंदार फणसे, कार्यकारी संपादक रविंद्र आंबेकर, तुळशीदास भोईटे यांना तसं काहीच महत्त्व नव्हतं. उपचार म्हणूनच सुरुवातीला त्यांना मंचावर काही मिनिटांसाठी बोलावण्यात आलं होतं. खरं तर बदनाम माणसाच्या चॅनेलमध्ये काम करावं की करू नये अशी चर्चा माध्यमकर्मींमध्ये सुरू आहे. सध्याचा मीडिया पाहता मुल्याधिष्ठीत पत्रकारिता करणार्यांना तसा माध्यम निवडीचा फारसा पर्याय नाही. त्यातल्या त्यात बरा मालक एवढाच काय तो भाग. तरीही एखाद्या पत्रकाराने कुणासोबत जावं हा त्याच्या विचार आणि निवड स्वातंत्र्याचा भाग आहे.
‘सामान्य माणसाच्या प्रश्नांशी आपली बांधिलकी असेल, प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या विरोधात आपण भूमिका घेऊ,’ असं मंदार फणसेंनी तिथे आपल्या मनोगतात सांगितलं. पण खरं तर एकूण सगळी परिस्थिती पाहता त्यांची मोठी परीक्षा आहे. या तिन्ही पत्रकारांना चॅनेलमधील कामाचा अनुभव आहे. मंदारने तर राजदीप सरदेसाई, निखिल वागळेंसोबत काम केलंय… ‘जय महाराष्ट्र’ या राजकारणात आधीच गुळगुळीत झालेल्या शब्दांची आणि पत्रकारितेची आब राखणं तसंच आपलं स्वातंत्र्य जपणं ही मंदार फणसे आणि त्यांच्या टीमची खरी कसोटी आहे.

 

साभार - कलमनामा