जळगाव - महापालिका आणि पोलीस प्रशासन मारहाण करणा-या महापालिका कर्मचा-यांवर कारवाई करण्यास तयार असताना, लोकमत प्रशासनाने शेपूट घातल्याने लोकमतचे रिपोर्टर सुधाकर जाधव मारहाण प्रकरणी अद्यापही संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल झालेला नाही.
जळगाव महापालिका कर्मचा-यांच्या विरोधात लोकमतने बातम्या दिल्यानंतर कर्मचा-यांनी लोकमतच्या अंकाची होळी करून, रिपोर्टर सुधाकर जाधव यांना बेदम मारहाण केली होती.या मारहाणीचे वृत्त बेरक्याने दिल्यानंतर राज्यभरातील पत्रकारांत संतापाची लाट उसळलेली आहे.मात्र लोकमत प्रशासन अद्यापही थंड आहे.
या मारहाण प्रकरणी अद्याप जाधव यांनी पोलीस किंवा महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केलेली नाही.केवळ मारहाणीची बातमी देवून लोकमतवाले मोकळे झालेले आहेत.मात्र कायद्यानुसार जोपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नाही,तोपर्यंत संबंधिताविरूध्द कारवाई होत नाही.
लोकमत प्रशासन गुन्हा दाखल करण्यास जाधव यांना परवानगी देत नाही आणि नोकरी जाईल, या भीतीपोटी जाधव यांनी स्वत:हून तक्रार दाखल केलेली नाही.लोकमत प्रशासनाला स्वत:च्या खपाची तर जाधव यांना नोकरीची काळजी आहे.लोकमतच्या अंकाची होळी करून,मुजोर कर्मचा-यांनी लाथा मारल्या होत्या,तर लाथा खावूनही जाधव यांच्यातील स्वाभिमान जागृत होत नाही,हे दुर्देवच म्हणावे लागेल.
त्यामुळे राज्यभरातील पत्रकारांनो अशावेळी बेरक्याने काय करावे आणि आपणही काय करणार ? गांधारीसारखे डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसा, दुसरे काय ?