सातारचे पत्रकार सचिन जवळकोटे यांच्यावर गुन्हा दाखल

कराड : कोळेकरवाडी (ता.पाटण) येथील एकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा येथील पत्रकार सचिन नागेश जवळकोटे यांच्यावर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी त्याबाबतची फिर्याद दिली आहे. 
श्री.भरणे यांनी दिलेली माहिती अशी : कोळेकरवाडी येथे १४ जानेवारी २०१३ रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा ढेबेवाडी पोलिसांत दाखल आहे. त्या गुन्ह्याबाबत आलेल्या वृत्तामध्ये ती मुलगी गर्भवती असल्याचा उल्लेख होता. मात्र, प्रत्यक्षात वैद्यकीय तपासणीत तसे आढळून आले नाही. १९ जानेवारीला संबंधित मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या चुलत्याने चुकीच्या आधाराने छापून आलेल्या वृत्तामुळेच माझ्या भावाने आत्महत्या केली असून, त्याबाबत योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी अर्जाद्वारे पोलिसांकडे केली होती. त्याबाबत पोलिसांनी चौकशी केली. वैद्यकीय अधिकारी, मुलीचे नातेवाईक, अर्जदार, श्री.जवळकोटे यांच्यासह अनेकांचे जबाब नोंदविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या माहितीनुसार वृत्त प्रसिद्ध केले, असे श्री.जवळकोटे यांने जबाबामध्ये म्हटले आहे. मात्र, हे वृत्त खोटे होते, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार श्री.भरणे यांनी फिर्याद दिली आहे.
(साभार : दैनिक सकाळच्या सातारा आवृत्तीत २६ जून २०१३ रोजी पान ४ वर प्रकाशित वृत्त)


* सचिन जवळकोटे हे लोकमतच्या सातारा आवृत्तीचे संपादकीय प्रमुख आहेत.