जळगावात ‘लोकमत’च्या वार्ताहराला मारहाण, साथीदाराला सोडून इतरांचे पलायन!

जळगाव - महापालिकेच्या कामचुकार कर्मचाºयांची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून आज दुपारी जळगावात ‘लोकमत’चे वार्ताहर सुधाकर जाधव यांना महापालिकेतील कामचुकारांनी मारहाण केली. विशेष म्हणजे महिला कर्मचाºयांनीही जाधव यांची कॉलर पकडून त्याला धक्काबुक्की केली. एकीने तर त्यांना पाठीमागून कंबरेत लाथ मारली. त्यामुळे खाली पडलेल्या जाधव यांना जबर मारहाण करण्याचा कामचुकारांचा इरादा होता. मात्र, ‘पत्रकारमित्र’ नगरसेवक कैलास सोनवणे मदतीला धावून आले आणि त्यांनी जाधव यांची कामचुकारांच्या तावडीतून सुटका केली.
‘लोकमत चमू’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या आधारे आजच्या जळगाव ‘लोकमत’मध्ये ‘हॅलो’ पुरवणीत ‘दांडीबहाद्दर: मनपातील 40 टक्के कमर्चारी बेशिस्त पालथ्या घड्यावर पाणी’ ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याविरोधात सकाळी कार्यालय सुरू होताच महापालिकेतील महिला कर्मचारी एकत्रित झाल्या. ‘लोकमत’च्या बातमीत छायाचित्र प्रसिद्ध झालेल्या महिलेला घरी मनस्ताप सहन करावा लागला, अशी कर्मचाºयांची तक्रार होती.  ‘तू घरून तर बरोबर वेळेवर निघतेस; कार्यालयात मात्र उशिरा पोहोचतेस, मग तू जातेस तरी कुठे?’ असा सवाल त्या महिला कर्मचाºयाला केला गेला होता. त्यामुळे त्या सहानुभूतीतून सर्वच कर्मचारी चटकन एकत्र आले.  ‘लोकमत’चा निषेध करायचा; प्रशासन व संपादकाला निवेदन द्यायचे असेच तेव्हा ठरले होते. मात्र, सर्व वर्तमानपत्राच्या कार्यालयात फिरून पत्रके वाटून ‘नेतेगिरी’ करणारा एक शिपाई कर्मचारी व रेल्वेचे ठेके घेणारा सफाई कामगार नेता यांनी या आंदोलनाची सूत्रे हाती घेताच खेळ बिघडला.
 
महापालिकेतील कामचुकारांनी मनपा इमारतीच्या प्रवेशद्वारापाशीच ‘लोकमत’ची होळी केली. नेमक्या त्याचवेळी राज्यव्यापी नियोजनाचा भाग म्हणून स्टिंग आॅपरेशनच्या फॉलोअपसाठी आलेल्या वार्ताहर सुधाकर जाधव यांच्याकडे महिलांनी मोर्चा वळविला व त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. आश्चर्य म्हणजे जाधव यांच्या बरोबरीने तेथे आलेला सहवार्ताहर आणि छायाचित्रकाराने सहकाºयाला संकटसमयी मदत करण्याऐवजी तेथून पलायन केले. ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात हा प्रकार कळल्यावर महापालिकेत पोहोचलेल्या ज्येष्ठ वार्ताहरालाही धक्काबुक्की केली गेली. यावेळी ‘दिव्य मराठी’च्या विरोधातही घोषणाबाजी केली गेली. 
‘बेरक्या’ या संपूर्ण प्रकरणाने कमालीचा व्यथित आहे. कारण ‘बेरक्या’ हा पत्रकारांचा पाठिराखा आहे; त्यांच्या सुख-दु:खातील साथीदार आहे. कोणत्याही पत्रकारावरील हल्ला, आघात ‘बेरक्या’ला अस्वस्थ करतात. मुख्य प्रवाहातील पत्रकारावर बातमीच्या राहातून झालेला आजचा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. ‘बेरक्या’ची ‘लोकमत’च्या व्यवस्थापनाला कळकळीची विनंती आहे की, सत्यासाठी लेखणी झिझविल्याने हुडदंगांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या पत्रकाराला वाºयावर सोडू नका. गुन्हा दाखल करा. जळगाव महापालिका आपल्याच ताब्यात आहे, कामचुकारांना घरची वाट दाखवा म्हणजे मग उद्या कुणी अशी हिंमत करणार नाही. जळगावातील पत्रकारांनो, आपणही विचार करा, आज ‘लोकमत’च्या पत्रकारावर ही वेळ आलीय; उद्या तुम्हीही याला बळी पडणार नाही कशावरून? उठा, संघटीत व्हा! ‘नको तिथे अतिसक्रिय’ असलेल्या जळगाव जिल्हा पत्रकारसंघाला साधी निषेधाचीही बुदधी सुचू नये, हे दुर्दैवच! अशी बाजारबुणगी किती दिवस संघटनेवर राहणार? श्रमिक पत्रकारांनो, तुम्हीच विचार करा. या संपूर्ण प्रकरणात  ‘बेरक्या’ पूर्णत: ‘लोकमत’च्या व्यवस्थापनाच्या पाठीशी आहे.  या मंडळींनी ‘लोकमत’ची होळी तर केलीच शिवाय मस्तवालपणे; उन्मंतपणे वर्तमानपत्र पायदळी तुडविले. हा खरेतर संपूर्ण पत्रकारिता जगावरच आघात मानायला हवा.