कासिम बंगाली पोलिसांचा खबरी? गँगरेपचे आरोपीचे पोलिसाला ५० कॉल

मुंबई : मुंबई गँगरेपप्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. यातील मुख्य आरोपी मोहम्मद कासिम शेख उर्फ कासिम बंगाली हा पोलिसांचा खबरी असल्याची माहिती उघड होत आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने सुत्रांच्या माहितीच्या आधारे ही बातमी छापली आहे.

गेल्या आठवड्यात फोटोग्राफर तरूणीवर गँगरेप झाला. याप्रकरणी कासिमसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मात्र कासिमच्या चौकशीत त्याचे पोलिसांशी कॉन्टॅक्ट असल्याचं समोर येत आहे. त्याचा कॉल डेटा चेक केला असता, गेल्या महिनाभरात त्याने आग्रीपाडा पोलिस स्टेशनमधील एका कॉन्स्टेबलला तब्बल ५० कॉल केल्याचं उघड झालं आहे. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी ही माहिती दिली.

कासिमला रविवारी पहाटे नायर हॉस्पिटलच्या टेरेसवरून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर त्याची चौकशी केली असता, तो खबरी असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.

“आम्ही कासिमची चौकशी करत होतो. त्यावेळी त्याचा कॉल डेटा चेक केला असता, त्याने महिनाभरात एकाच नंबरवर ५० हून अधिक कॉल केले आहेत. हा नंबर तपासला असता, तो आग्रीपाडा पोलिस स्टेशनमधील एका पोलिसाचा असल्याचं समजलं. त्यामुळे तो पोलिसांचा खबऱ्या असल्याची माहिती समोर आली”, असं क्राईम ब्रांचच्या एका ऑफिसरने सांगितलं.

तसंच त्या पाशवी कृत्याच्या दुसऱ्या दिवशी, या पोलिसाने कासिमला वैयक्तिक कामानिमित्त भेटण्यासाठी कॉल केला होता. दरम्यान, कासिम हा या गँगरेपमधील संशयित असल्याचं समोर आलं आणि त्याचवेळी तो फरारही झाला होता.

या कृत्यावेळी विजय जाधव आणि सलिम अन्सारी यांनी पीडित तरुणी आणि त्याच्या सहकाऱ्याला, कासिम हा आमचा बॉस असल्याचं सांगितलं होतं. आणि तुम्ही परवानगीशिवाय इथे फोटो काढत आहात. काही दिवसांपूर्वी इथं खून झाला असून तुम्ही त्यातील आरोपी असू शकता. त्यामुळे तुम्ही आमच्या बॉसला भेटा, असं विजय आणि सलिमने पीडितांना सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

 ABP Majha