अत्यंत धक्कादायक! मुंबईतील ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांची आत्महत्या


अत्यंत धक्कादायक! 'जीजीपिक्स' (ggpics.com) या नावाने रोजच्या कार्यक्रमांची छायाचित्रे उपलब्ध करून देणारी वेबसाइट चालविणारे, छायाचित्रकार म्हणून दबदबा निर्माण करणारे गजाननराव घुर्ये (वय ५८) गेले; दादरमधील शिवसेना भवनजवळ असलेल्या साईचरण या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर घुर्ये कुटुंबियांसह राहत होते. शनिवारी पहाटे त्यांनी बेडरुममध्ये ओढणी पंख्याला बांधून गळफास घेतला. सकाळी साडेसातला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र हलाहल व्यक्त होत आहे. 
३५ वर्ष त्यांनी छायाचित्रकलेची सेवा केली. त्यांनी राजकीय फोटोग्राफीला उंची मिळवून देतानाच महाराष्ट्रभरातील छोट्या दैनिकांची मोठीच सोय केली होती. अनेक फोटोग्राफर, पत्रकार त्यांनी तयार केले. एखाद्या राजकीय वा शासकीय कार्यक्रमाचा फोटो कुठेही नसला तरी हमखास तो घुर्ये यांच्याकडून त्यांना मिळत होता. सगळ्याच राजकीय नेत्यांशी त्यांचे अगदी जवळचे संबंध राहिले. वसंतदादा पाटील यांच्यापासून ते शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे अशा सर्वच मुख्यमंत्र्यांच्या ते खास मर्जीतले होते. 
घुर्ये गेल्या काही दिवसांपासून निराश होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. काही दिवसांपासून ते अज्ञात कारणांमुळे अस्वस्थ होते आणि त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जाते... राजकारणातील जय-पराजय, आनंद, निराशा, जल्लोषाचे अनेक क्षण अचूक टिपणा-या गजानन घुर्येंच्या मनातील ही अस्वस्थता मात्र कोणालाच टिपता आली नाही... 
काळाची गरज ओळखून पत्रकारितेत नवे काय केले पाहिजे, याचे ते एक उत्तम उदाहरण होते... फोटो म्हटले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक मोठ्या नेत्यांच्या तोंडात पहिले नाव यायचे ते गजानन घुर्येंचे... मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या राजकीय कार्यक्रमात स्वत: घुर्ये किंवा त्यांचा सहकारी फोटोग्राफर आवर्जून उपस्थित असायचे... 
पत्रकार विश्वाचा चांगला मित्र, धडपड्या आणि धाडसी छायाचित्रकार गजानन घुर्ये यांनी आत्महत्या केल्याची दु:खद बातमी म्हणजे आघात!
गजानन घुर्येंना श्रद्धांजली...