रेल्वेच्या सर्व महिला डब्यांमध्ये सुरक्षा द्या ...महिला पत्रकारांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई - मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या उपनगरी लोकलसेवेतील महिलांच्या सर्व डब्यांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावे तसेच पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या महिलांची कैफियत तातडीने नोंदवून घेतली पाहिजे , अशा मागण्या न्यूज चॅनेलमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल के . शंकरनारायणन यांच्याकडे केल्या . या प्रश्नी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू , असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले .
मुंबईत महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत संपूर्ण राज्यात संतापाची लाट असून , महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे . लोकलच्या सर्व महिला डब्यांमध्ये पोलिसांकडून सुरक्षाव्यवस्था पुरविली जात नाही . त्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण दिले जाते . त्यामुळे लोकल गाड्यातील महिला प्रवाशांची सुरक्षेला प्राधान्य द्यावे , अशी मागणी केल्याचे पत्रकार नेहा पुरव यांनी सांगितले . बऱ्याच रेल्वे स्टेशनच्या आवारात गर्दुल्ले व समाजकंटक प्रवृत्ती मोकाट फिरत असून , अशा प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त होणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली . या शिष्टमंडळात प्रीती सोमपुरा , प्रणाली कापसे , भारती व अन्य पत्रकार सहभागी झाल्या होत्या , असे पुरव यांनी सांगितले .