दै. ‘दिव्य मराठी’च्या अमरावती आवृत्तीचे थाटात लोकार्पण

अमरावती - दै. ‘दिव्य मराठी’च्या अमरावती आवृत्तीचे आज (शनिवार) मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह दैनिक भास्करने दै. ‘दिव्य मराठी’च्या रूपाने विदर्भात पाऊल ठेवले असून, अमरावती ही दैनिकाची विदर्भातील अकोल्यानंतरची दुसरी आवृत्ती आहे.

अमरावती आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मोर्शी रोडवरील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात थाटात पार पडला. भाजपचे सरचिटणीस खासदार राजीव प्रताप रुडी, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, केरळचे माजी राज्यपाल रा. सू. गवई, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, सामाजिक न्याय व व्यसनमुक्ती कार्य मंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व औषधी प्रशासनाचे मंत्री मनोहर नाईक, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रावसाहेब शेखावत, दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल आदी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी पत्रकारितेत नवनवे विक्रम प्रस्थापित करणार्‍या या समूहाच्या महाराष्ट्रात औरंगाबाद, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर आणि अकोला आवृत्त्या आहेत. अमरावतीमधील वाचकांना 11 ऑगस्टपासून दै. ‘दिव्य मराठी’चा अंक मिळणार आहे.