‘पंढरी भूषण’ हे जिल्ह्याचे मुखपत्र बनेल -संजय आवटे

पंढरपूर - विठूरायाच्या पंढरी नगरीत नव्याने सुरु होणारे ‘पंढरी भूषण’  हे दैनिक आपल्या इच्छा, आकांक्षांना आवाज देईल. लोकसहभागातून त्याचा मोठ्याप्रमाणावर विस्तार होईल. प्रत्येकाला हे दैनिक माझे आहे, असे वाटेल आणि काही काळातच ते इथल्या जनतेचे मुखपत्र बनेल, असा विश्वास जेष्ठ पत्रकार आणि दै. कृषीवलचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केला.

साप्ताहिक दीपज्योती परिवाराच्यावतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘दै. पंढरी भूषण’  चा प्रकाशन सोहळा गुरुवारी येथील संत तनपुरे महाराज मठात झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एस.टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. भारत भालके, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष सुभाष वारे, निवृत्त माहिती संचालक वसंतराव शिर्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आवटे म्हणाले, पंढरी भूषण हे दैनिक माध्यमांच्या विश्वात ख-या अर्थाने पंढरीचे भूषण ठरले आहे. आगामी काळात आणखी उत्तम कार्य करून पंढरपूरकरांचा विश्वास हे दैनिक सार्थ ठरेल. ही माध्यम विश्वात कल्पनेपेक्षा अफाट बदल होत आहेत. पुर्वीसारखी या क्षेत्रात कोणाची मक्तेदारी राहिली नाही. कोणीही आता लिहू शकतो, अशी परिस्थिती आहे. सोशल मिडीया साईटस्वर आपल्याला हे अनुभवास येत आहे.

सध्या अनेक मोठी वृत्तपत्रे स्थानिक जिल्हा पातळीवर येवून आपल्या जिल्हा आवृत्ती काढत आहेत.  त्याचे कारण असे की, येत्या स्पर्धेच्या काळात माध्यमांना टिकून रहावयाचे असल्यास स्थानिक पातळीवर येवून काम करावे लागेल. त्यामुळे स्थानिक छोट्या दैनिकांना येत्या काळात उज्वल भवितव्य आहे. भारताच्या अभ्युदयात महत्वाची भूमिका कोणी बजावली असेल तर ती म्हणजे माध्यमांनी. जागतिकीकरणानंतर माध्यम विश्वात पसारा मोठा वाढला असल्याने आता त्यात अनेकांना संधी उपलब्ध झाल्या आहेत. धर्म, जात आणि लिंगाच्या पलीकडे माध्यम पोहोचले आहे. हा बदल माणुसकीच्या दिशेने जाणारा आहे. विचार आणि कृती यात कसलीही तफावत न ठेवता जनसामान्यात हे दैनिक अढळ स्थान निर्माण केले. प्रत्येकाला हे दैनिक माझे आहे, असे वाटेल आणि काही काळातच ते जनतेचे मुखपत्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आ. भारत भालके म्हणाले, २१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे शतक आहे. सर्व क्षेत्रात बदल होत आहेत. तसेच वृत्तपत्र क्षेत्रातही बदल होत आहेत. आगामी काळात तर माध्यमांना मोठ्या प्रमाणावर वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून बातम्या सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनेक वृत्तवाहिन्या असल्यामुळे जगाच्या कानाकोप-यातील प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत सहज पोहोतचे. असे असताना वृत्तपत्रांनी नेमकी कोणती भूमिका घ्यायला हवी ? याबाबतचा विचार होणे आवश्यक आहे. आपल्या शक्तीने, बुद्धीने व युक्तीने आपण या सा-यांवर मात करून हे दैनिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैचारिक, दर्जेदार मजकुरावर आपण अधिकाधिक भर देवून वाचकांना आकर्षित कराल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्र सेवा दलाचे सुभाष वारे म्हणाले, दैनिकांनी व्यापक हिताचे प्रश्न हाताळण्याची आवश्यकता आहे. राजकीय मंडळींचा दांभिकपणा समोर आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. जातीच्या, धर्माच्या नावाने संघटना का चालविल्या जातात, त्यामागचे खरे कारण काय ? याचा शोध घ्यायला हवा. सध्या देशात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. यातील अनेक प्रकरणे ही माध्यमांनी उकरून काढली आहेत. माध्यमांचेच हे यश म्हणावे लागेल. यासा-या प्रक्रियेत विरोधी पक्ष कुठे आहे ? याचाही विचार आपण करायला हवा. यामागची खरी कारणे समोर आणण्यासाठी दैनिकांनी पुढाकार घ्यायला हवा. बहुजनांच्या सांस्कृतिक जिवनाला आयाम देण्याचे काम आजपर्यंत दीपज्योती परिवाराने केले आहे. आगामी काळातही ते अशाच पध्दतीने सुरु राहिल, असा विश्वास मला वाटतो. जनतेच्या प्रश्नांना बांधील असणारे हे वृत्तपत्र असावे. प्रत्येक जनतेने हे आपले वर्तमानपत्र आहे, असे मानले पाहिजे. असे कार्य आपल्या हातून घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वसंतराव शिर्के म्हणाले, समाजवादी विचारांच्या मुशीतून हे दैनिक तयार झाले आहे. त्यामुळे समाजवादी विचार आणखी जोपासला जावून ते अधिक प्रमाणात रुजेल. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची धडपड आपल्या दैनिकाच्या माध्यमातून होईल. शासनाच्यावषतीने पत्रकारांसाठी अनेक सोई-सुविधा देण्यात येतात. त्याचा लाभ सर्व पत्रकारांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपाचे शहराध्यक्ष उमेश वाघुलीकर म्हणाले, संपादक शिवाजीराव शिंदे हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांनी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असताना उत्तमरितीने पत्रकारिताही केली आहे. त्यांचे हे कार्य साप्ताहिक दीपज्योतीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचले आहे. अथक परिश्रमातून व खडतर वाटचालीतून त्यांनी सा. दीपज्योतीला लोकप्रियता मिळवून दिली तशीच दै. पंढरी भूषण या दैनिकाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी आ. सुधाकरपंत परिचारक म्हणाले, पंढरपूरकरांसाठी ही खरी आनंदाची बाब आहे. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या दैनिकाने करावा. स्थानिक भागातील प्रश्नांना आपल्या दैनिकात उत्तम प्रकारे स्थान द्यावे. जनतेच्या अपेक्षांना बळ देण्याचे काम आपल्या दैनिकाच्या माध्यमातून होईल. आम्हा सर्वांना अभिमान वाटावा असे कार्य आपण दैनिकाच्या माध्यमातून कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले दैनिक अतिशय दर्जेदारपणे प्रकाशित होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंढरी नगरीत पंढरीभूषणचे प्रकाशन

पंढरपुर - विठूरायाच्या पंढरी नगरीत गुरुवारी शानदार सोहळ्यात दै. पंढरी भुषणचे प्रकाशन करण्यात करण्यात आले. कृषीवलचे संपादक संजय आवटे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, आ.भारत भालके, राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष प्रा. सुभाष वारे यांच्या हस्ते या दैनिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने माध्यमांची सध्यस्थिती आणि आगामी वाटचाल याविषयी संजय आवटे यांनी केलेले आवेशपुर्ण भाष्य सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरले. दैनिकाचा उत्तम लेआऊट, संस्थापक संपादक शिवाजीराव शिंदे यांना माध्यम क्षेत्रातील असलेला अनुभव गेली ११ वर्षे ते दीपज्याती नावाचे साप्ताहिक चालवित आहेत  आणि तरुण, नव्या दमाचे कार्यकारी संपादक रविराज कुचेकर या दैनिकाला लाभल्याने अल्पावधीतच हे दैनिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचेल, असा विश्वास अनेक मान्ववरांनी व्यक्त केला. रविराज कुचेकर हे शैलिदार लेखणीसाठी ख्यातनाम असेलेले दै. कृषीवलचे संपादक संजय आवटे तसेच जेष्ठ पत्रकार, टेक्नोसेव्ही, आणि लेआउटची खास जाण असलेले विक्रांत पाटील यांच्या मुशीतून तयार झाले आहेत. कृषीवलमध्ये त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली होती. या दोन्ही गुरुंचा हा शिष्य पंढरपूरमध्ये आपली कारकीर्द गाजवेल असा विश्वास संस्थापक संपादकांनी व्यक्त केला.