ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक प्रभातचे माजी संपादक माधवराव खंडकर यांचे निधन


पुणे  - प्रभातचे माजी संपादक आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव गंगाधर खंडकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 79 वर्षांचे होते. खंडकर यांच्यामागे पत्नी, एक भाऊ, पुतण्या असा परिवार आहे.
कोकणातून येथे आलेल्या खंडकर यांनी अतिशय बिकट परिस्थितीतून शिक्षण घेतले. अगदी तरुण वयातच त्यांनी दैनिक प्रभातमध्ये शिपाई म्हणून नोकरी करत शिक्षण पूर्ण केले. दैनिक प्रभातचे संस्थापक वा. रा. कोठारी यांनी त्यांची चिकाटी आणि सामाजिक तळमळ पाहून पुढे प्रभातमध्ये त्यांची संपादक म्हणून नियुक्ती केली. आयुष्याची तब्बल 55 वर्षे प्रभातच्या सेवेत असताना तब्बल 35 वर्षे त्यांनी संपादकपदाची धुरा सांभाळली.
सामाजिक कार्याशी आपल्या पत्रकारीतेची नाळ पक्की जोडणारा संपादक म्हणून ते ख्यातकिर्त होते. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आणि चळवळींमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील समस्या आणि गावकर्‍यांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी त्यांनी तब्बल चारशे गावांना भेटी देऊन गावकर्‍यांशी थेट संपर्क साधला होता. आठवड्यातून एकदा किमान पाच ते सहा गावांना भेट देऊन ते गावकर्‍यांशी पारावर बसून संवाद साधत असत. त्यांचे प्रश्‍न समजून घेतानाच एक गाव एक पाणवठा, एक गाव एक स्मशान ही चळवळ त्यांनी गावोगाव रूजवली होती. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे संपादकपदावर कार्यरत असताना कार्यालयीन कामकाजात एकहंी दिवस सुट्टी घेतली नव्हती. त्यांची रंगतरंग आणि चौकातली चर्चा ही सदरे अनेक वर्षे दैनंदिन स्वरूपात प्रसिद्ध होत असत. अत्यंत सौम्य आणि समजुतीच्या भाषेत परंतु प्रभावीपणे सामाजिक समस्या या सदरातून ते मांडत, त्याचा स्थानिक प्रशासनावर खूप प्रभाव पडत असे. केवळ माधवरावांनी आपल्या सदरात एखाद्या समस्येचा उल्लेख केला तरी महापालिका किंवा सरकारी यंत्रणा त्याची दखल घेत असे याची अनेक उदाहरणे अनेकांना माहिती आहेत. 

मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या खंडकर यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर बंडू गायकवाड, शिवसेनेचे संपर्कनेते गजानन किर्तीकर, आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, रमेश बागवे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभय छाजेड,  शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे, रिपाइंचे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे, रिपाइं मातंग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हनुमंत साठे, मनसेचे नगरसेवक रविंद्र धंगेकर, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, राष्ट्रभाषा प्रसार सभेचे ज. गं फगरे, शिक्षण मंडळ सदस्य लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब जानराव, नुरूद्दीन सोमजी, आज का आनंदचे संपादक शाम आगरवाल, आनंद आगरवाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, साहित्य परिषदेचे सुनिल महाजन, ललित रुणवाल, नितीन पवार, आनंद सराफ, विकास देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागुल, अरुण खोरे, सुकृत खांडेकर, संजीव शाळगांवकर, नंदकुमार काकिर्डे, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश धोंगडे, राजेंद्र नाईक यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते.
 

श्रद्धांजली सभा 30 ऑक्टोबरला
ज्येष्ठ पत्रकार माधवराव खंडकर यांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमिक पत्रकार संघाच्या हॉलमध्ये सकाळी 11 वाजता ही श्रद्धांजली सभा होईल.