प्रतापराव पवार यांना "स. मा. गर्गे पुरस्कार' प्रदान

बीड- "सकाळ' हे केवळ वर्तमानपत्र नसून सामाजिक अभिसरणाचे आणि विधायक चळवळीचे रूप बनले आहे. "तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियान' सुरू करून राज्यातील हजारो महिलांना हक्काचे व्यासपीठ "सकाळ'ने उपलब्ध करून दिले,'' असे प्रतिपादन खासदार गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी केले.

बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा स. मा. गर्गे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी खासदार मुंडे बोलत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) जयदत्त क्षीरसागर, महसूल राज्यमंत्री सुरेश धस, स्वागताध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, पत्रकार संघाचे संस्थापक संतोष मानूरकर, अध्यक्ष वसंत मुंडे आदी उपस्थित होते.

श्री. मुंडे म्हणाले, ""या वर्षीचा हा पुरस्कार प्रतापराव पवार यांना दिल्यामुळे पुरस्काराचा बहुमान वाढला आहे. "सकाळ' वाचल्याशिवाय पुण्यात कुणी चहादेखील घेत नाही. राजकीय पुढाऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रशिक्षणाची गरज होती; त्याचाही प्रयोग "सकाळ'ने यशस्वीपणे केला.''
श्री. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ""प्रतापराव पवार म्हणजे केवळ पत्रकारितेच्या चौकटीत स्वतःला बांधून न घेणारे व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा दिसतात. सामाजिक क्षेत्राला उभारी, उमेद देण्याचे काम त्यांनी केले. आमच्यासारखी मंडळी कुठे चुकतात, हे दाखविण्याचे काम "सकाळ' करीत आहे. समाजाची स्पंदने टिपणारा "सकाळ' हा टीपकागद आहे.''

श्री. सुरेश धस म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमी लिखाण करणारा "सकाळ' हा एकमेव माध्यम समूह आहे. "ऍग्रोवन'च्या माध्यमातून शेती क्षेत्राशी निगडित अगदी बारीकसारीक गोष्टी वाचायला मिळतात. पत्रकारांनी शक्‍यतो दोन्ही बाजूंचा विचार केला पाहिजे. कांदा महाग झाला त्या वेळी दिवसरात्र टीव्हीवर केवळ कांद्याच्या महागाईच्या बातम्या होत्या; पण आता कांदा 100 रुपयांवरून 18 रुपये किलोपर्यंत खाली आला; याची मात्र चर्चा झाली नाही.''

सत्काराला उत्तर देताना श्री. पवार म्हणाले, ""व्यक्ती म्हणून मी पुरस्कार स्वीकारत नाही, तर "सकाळ'चा प्रतिनिधी म्हणून स्वीकारत आहे. हा गौरव "सकाळ समूहा'चा आहे. बीडमध्ये पत्रकार संघ एकत्रित येऊन काम करतो, याचा मला आनंद वाटतो. मी राजकारणापासून दूर आहे, याचा अर्थ मी पुढाऱ्यांबद्दल आकस ठेवतो, असा मुळीच नाही. उलट मला त्यांचे कौतुक वाटते. विधायक कामांची इच्छा ही माझ्या मनाला भावणारी गोष्ट आहे.

पुण्यात वेगवेगळ्या दैनिकांमधील पत्रकारांनी एकत्र येऊन चांगल्या कामांची सुरवात केली होती. सामाजिक प्रश्‍नांवर एकत्रितपणे प्रयत्न झाले, तर समस्या लवकर सुटू शकतात. ज्या वेळी आपण एकमेकांतच भांडतो, तेव्हा आपलीच शक्ती विभागली जाते. याशिवाय लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनीही एकत्रितपणे काम केल्यास दहा वर्षांमध्ये देश बदलू शकतो. मलेशियामध्ये "पेमांडू'च्या माध्यमातून 30 वर्षांचे नियोजन केले आहे. प्रत्येक समस्या विभागवार सोडविण्यासाठी या संकल्पनेचा वापर केला आहे. हीच संकल्पना राज्यातही साकारण्याचा "सकाळ'चा मानस आहे.''

"सकाळ'मध्ये जातिवाद, भाषावाद किंवा प्रांतवादाला थारा नाही. केवळ माणूस हा केंद्रबिंदू मानून "सकाळ'ची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.
न्यायमूर्ती देशमुख म्हणाले, ""परखडपणा याचाच अर्थ पत्रकारिता आहे. विघातक प्रवृत्तींवर प्रहार करण्याचे प्रमुख काम पत्रकारितेचे आहे.''
""पुढाऱ्यांमध्ये मतभेद असावेत, मनभेद असू नयेत. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे,'' असे घोळवे म्हणाले.

स्वागताध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, ""वृत्तपत्र आणि समाज यांच्यात सुसंवाद साधण्याचे काम प्रतापराव पवार करत आहेत. विकासात्मक पत्रकारिता, विविध सामाजिक उपक्रम "सकाळ'ने सुरू केले. जगातील नवीन प्रवाह प्रयोगांच्या प्रगल्भ दृष्टीतून "सकाळ'ची प्रगती होत आहे.'' पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुंडे यांनी प्रास्ताविक केले. सुशील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

पुरस्काराची रक्कम पत्रकार प्रशिक्षणासाठी
एक लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराची रक्कम मला नको, असे सांगून हे एक लाख रुपये पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी खर्च करण्याचे आवाहन प्रतापराव पवार यांनी केले आणि लगेचच धनादेश पत्रकार संघाकडे सुपूर्त केला.