हा पत्रकार वेडा कसा?

दासगुप्ता 'लोकमत'मध्ये आले अन् भरभरून बोलले 
शफी पठाण ■ नागपूर
घरच्या अठराविश्‍व दारिद्रय़ामुळे कचरा वेचून पोट भरणार्‍या रवींद्र दासगुप्ता या ज्येष्ठ पत्रकाराला वेडा ठरविण्याचा निंदनीय प्रकार काही मंडळींनी सुरू केला आहे. हलाखीचे जीवन जगणार्‍या दासगुप्तांना आर्थिक मदत व्हावी, या भावनेतून 'लोकमत'ने पुढाकार घेतल्यानंतर काही कारण नसताना ही मंडळी दासगुप्तांना वेडा ठरवायचा प्रयत्न करीत आहेत. ते घरचे श्रीमंत असून त्यांना मदतीची गरज नाही, असेही यांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर दासगुप्ता यांना आज बुधवारी दुपारी 'लोकमत' कार्यालयात आमंत्रित केले. यावेळी त्यांनी 'लोकमत'च्या संपादकीय विभागातील कर्मचार्‍यांसोबत विविध विषयांवर तब्बल दोन तास चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. परंतु या प्रदीर्घ चर्चेत कुठेही कुणाबद्दल तक्रार केली नाही किंवा कुणाला शिव्याही दिल्या नाहीत. अस्खलित इंग्रजीत बोलणारे, जुन्या आठवणी तारीख व संदर्भासह सांगणारे व पत्रकारितेचे अनेक तांत्रिक पदर उलगडून दाखविणारे दासगुप्ता वेडे कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
या चर्चेदरम्यान दासगुप्ता यांनी जे सांगितले ते खरेच मोलाचे होते. दासगुप्ता म्हणाले, माझी आज जी परिस्थिती झाली आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुणाबाबतही राग वा द्वेष नाही. १९८0 साली मी पत्रकारितेत आलो तेव्हा माझा पगार अडीचशे रुपये होता.
१९९६ ला जेव्हा आमचे दैनिक बंद पडले तेव्हा मला साडेआठशे रुपये मिळायचे. परंतु दैनिक बंद पडल्यानंतर तो आधारही हिरावला. सहा बहिणी आहेत यातील पाच वेगवेगळया शहरात राहतात. नागपुरात जी बहीण आहे तिच्या आधारानेच मी राहात आहे. परंतु तिचीही आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही. आर्थिक आधार मी गमावला आहे. परंतु किमान मानसिक आधार तरी कायम असावा म्हणून मी रोज सायंकाळी रामकृष्ण मठात जातो व तेथे ध्यान करतो. जुने दिवस आठवतात तेव्हा डोळ्यात अश्रू उभे राहतात असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

 स्मरणशक्ती शाबूत, संदर्भही मुखपाठ
या संपूर्ण चर्चेदरम्यान दासगुप्ता यांनी पत्रकारितेच्या काळातील अनेक आठवणी सांगितल्या. त्या सांगताना ते अचूक तारीख व नेमका संदर्भही सांगायचे. कित्येक पत्रकारांची नावे तर त्यांना त्यांच्या वडिलांच्या व आडनावासह मुखपाठ होती. पत्रकारितेपासून सुमारे १८ वर्षांपासून अलिप्त असतानाही त्यांना या आठवणी व संदर्भ मुखपाठ असतील तर दासगुप्तांना मानसिक आजार आहे, असा अपप्रचार करणारी ही मंडळी कुठल्या आधारावर असे सांगताहेत हेही स्पष्ट व्हायला हवे.

पत्रकार दासगुप्ता मनाचे श्रीमंत : समाजाच्या आधाराची गरज

लिखाण अन मार्गदर्शन
दासगुप्ता म्हणाले, त्यावेळी मी मुद्रितशोधक असतानाही घोकन दासगुप्ता या टोपण नावाने लिहायचो. फिल्मफेअर, स्टार अँण्ड स्टाईल यासारख्या त्यावेळच्या प्रसिद्ध पत्रिकांमध्ये मी लिखाण केले आहे. माझ्या उत्कृष्ट लिखाणाला अनेक पुरस्कारही मिळाले.
जे केले ते प्रामाणिकपणे केले. या समग्र काळात एक दिवसही अकारण रजा घेतली नाही. परंतु माझ्यात प्रतिभा असतानाही तिला योग्य न्याय मिळाला नाही. आताचे अनेक दिग्गज पत्रकार त्यावेळी एखादा शब्द अडला की मला विचारायचे. पण, मी कधीच मोठेपणाचा आव आणून त्यांना निराश केले नाही. माझ्यापेक्षा कनिष्ठ असलेले लोक माझ्या पुढे गेले. त्यांच्यात नक्कीच प्रतिभा होती म्हणूनच ते हे यश गाठू शकले, असा मनाचा मोठेपणा जपणारे दासगुप्ता खरच वेडे असतील?
'लोकमत' कर्मचार्‍यांनी केली मदत
दासगुप्ता 'लोकमत' कार्यालयात आले तेव्हा त्यांना बघूनच त्यांच्या परिस्थितीची जाणीव झाली. अन् ते जेव्हा बोलायला लागले तेव्हा हा माणूस किती 'ग्रेट' आहे हेही कळून चुकले. ध्येयवादी पत्रकारितेसाठी आयुष्य वेचणारा हा प्रामाणिक पत्रकार आज कचरा वेचतोय हे बघून हृदय हेलावले व त्यांना तातडीची मदत व्हावी, या उद्देशाने 'लोकमत'च्या संपादकीय सहकार्‍यांनी एक छोटीशी रक्कम गोळा करून त्यांच्या स्वाधीन केली.
पत्रकार संघटनांनी पुढे यावे
या चर्चेत दासगुप्ता यांनी वैयक्तिक मदत करणार्‍या पत्रकार संघटनांच्या जुन्या सहकार्‍यांचे आभार मानले परंतु त्यासोबतच पत्रकारांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणून मला या संघटनांकडून कोणताच आधार मिळाला नाही, ही खंतही व्यक्त केली. आतापर्यंत दासगुप्तांची व्यथा या संघटनांना कळली नसेलही कदाचित. परंतु आता 'लोकमत'ने ती पुढे आणल्यानंतर तरी दासगुप्तांना मदत लाभावी यासाठी पत्रकार संघटनांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
येथे साधा संपर्क
दासगुप्ता यांना समाजाने मदती करावी असे आवाहन परत एकदा 'लोकमत'कडून करण्यात येत आहे. रवींद्र दासगुप्ता, राय यांच्या घरी, कुसुमताई वानखेडे सभागृहाच्या मागील बाजूस, काचीपुरा, रामदासपेठ या पत्त्यावर ते सहज सापडतील. याशिवाय त्या परिसरात 'घोकन' दासगुप्ता यांच्याबद्दल विचारणा केली तर सहज पत्ता सापडतो. याशिवाय कुसुमताई वानखेडे सभागृहाच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपरीवरदेखील ते दिवसा बसलेले असतात. सायंकाळच्या सुमारास ते रामकृष्ण मठातदेखील हमखास जातात. 
नागपूर : ज्येष्ठ पत्रकार दासगुप्ता यांची कर्मकहाणी 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच काही मंडळींनी दासगुप्तांची आर्थिक परिस्थिती कशी उत्तम आहे व ते कसे मजेत बंगल्यात राहतात, असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती जाणूून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने दासगुप्ता यांच्या घरी भेट दिली असता सर्व चित्रच स्पष्ट झाले. जेथे दासगुप्ता राहतात मुळात तो बंगला नाहीच. ती केवळ एक मोठी पण मोडकळीस आलेली इमारत आहे. दाराच्या डाव्या बाजूला मोडून पडलेला सोफा, पलंगावरची मळकट चादर अन् किचनमधील जुनाट भांडी दासगुप्ता अन् त्यांची बहीण किती 'श्रीमंत' आहे, हे न विचारताच सांगायला लागली.

साभार - दैनिक लोकमत, नागपूर