बेरक्यानंतर लोकमतने घेतली, दासगुप्तांच्या दुर्देवी कहाणीची दखल

कचरा वेचून पोट  भरतोय 'कलम का पुजारी'
झुंजार पत्रकाराची व्यथा : १६ वर्षांच्या साधनेची अशीही परिणती
शफी पठाण ■ नागपूर 

ना तोफ निकालो, ना तलवार निकालो
गर जंग मुखातीब हो, तो अखबार निकालो..

अशा शब्दांत वृत्तपत्राचे सार्मथ्य विशद केले जाते. तोफ आणि तलवारींनी जे शक्य नाही ते वृत्तपत्रातल्या एका बातमीने घडू शकते, असा या शब्दांचा अर्थ आहे. त्यालाही असेच वाटायचे. नव्हे, त्याची निष्ठाच होती या शब्दांवर. एका टोकाला श्रीमंतीचा पाऊस कोसळतोय धो धो अन् दुसर्‍या टोकाला उपाशापोटी मरणार्‍यांना पोटात घेणारे नुसतेच वाळवंट अस्वस्थ करायचे त्याच्या संवेदनशील मनाला. बंगालचा लढवय्या इतिहास त्याच्या रक्तातून सळसळत वाहात होता. परंतुु शस्त्रावर त्याचा विश्‍वास नव्हता म्हणून मग त्याने लेखणी हाती घेतली. गरम रक्ताची ही सळसळ शब्दांत बांधून समाज परिवर्तनाचा बिगुल फुंकण्यासाठी तो अगदी ठरवून पत्रकारितेत आला. ऐन उमेदीची तब्बल १६ वर्षे त्याने या क्षेत्रात घालवली. कर्तव्यनिष्ठेत संसाराची बाधा नको म्हणून लग्नही केले नाही. केवळ पत्रकारितेसाठी असा त्याग स्वीकारणारा कलम का हा पुजारी आज रस्त्यावरचा कचरा वेचून पोट भरतोय. ही विदारक कहाणी आहे एकेकाळी नागपूर टाइम्ससारख्या प्रसिद्ध दैनिकात काम करणार्‍या रवींद्र दासगुप्ता यांची.
दासगुप्ता मूळचे बंगालचे. वडिलांसोबत नागपूरला आले. इंग्रजी माध्यमातून बी.ए. केल्यानंतर हजार पर्याय होते नोकरी-व्यवसायाचे. परंतु समाजात वाढणारी श्रीमंत-गरिबांमधली दरी त्यांना पाहावत नव्हती. हे चित्र बदलले पाहिजे या विचारांनी दासगुप्ता झपाटले होते. तो काळ तसा नक्षल चळवळीच्या उभारणीचा होता. परंतु विचारांनी भरकटलेली सशस्त्र क्रांती त्यांना मान्य नव्हती. म्हणून दासगुप्तांनी १९८0 साली पत्रकारितेची विधायक वाट स्वीकारली. नागपूर टाइम्समध्ये पूर्ण वेळ सेवा देऊनही इतर दैनिकांत ते टोपण नावाने लिहायचे. विविध विषयांवर त्यांनी सडेतोड भाष्य केले. अनेकदा त्याचे वाईट परिणामही त्यांना भोगावे लागले. परंतु तडजोड त्यांना माहीतच नव्हती. एक दिवस दुर्दैवाने दैनिक बंद पडले अन् दागसुप्तांआड दडलेला लढवय्या पत्रकार कोलमडून पडला तो पुन्हा सावरलाच नाही. लग्न केलेच नव्हते. त्यामुळे कुणाच्या आधाराचा प्रश्नच नव्हता. सहा बहिणींचा हा लाडका भाऊ नोकरी गमावल्यानंतर एका क्षणात परका झाला. परंतु यातल्या एका बहिणीने गरीब असूनही मोठय़ा हिमतीने मदतीचा हात समोर केला. परंतु स्वाभिमानी आयुष्य जगणार्‍या दासगुप्तांना ही दया नको होती. म्हणून त्यांनी असा कचरा वेचण्याचा पर्याय स्वीकारला. शंकरनगर मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहाजवळ त्यांचे घर आहे पण त्या संपत्तीवर त्यांचा मोह नाही. त्या घरात त्यांच्या बहिणी राहतात. जी लेखणी मला जीवापाड प्रिय होती ती दुरावली. आता या घराचे मी काय करू, असा त्यांचा सवाल आहे. नोकरी आता राहिली नाही. परंतु शब्दांचा साथ काही सोडवत नाही. रोज सकाळी-सायंकाळी ते शहरातल्या वाचनालयांत शोधत असतात जुने दिवस. परंतु त्यांची अशी बकाल अवस्था बघून कुणी त्यांना आत प्रवेशच देत नाही. काही जण तर तू पढ के क्या करेगा, अशा शब्दांत त्यांची हेटाळणी करतात. परंतु हा माणूस म्हणजे कधीकाळी शब्दांचे विद्यापीठ होता हे त्या पामरांना कोण सांगणार?
नोकरी चाहिये, पर देगा कौन?
दासगुप्ता आज रस्त्यावरचे भणंग आयुष्य जगत असले तरी त्यांच्यात दडलेला पत्रकार मात्र आजही श्रीमंत आहे. इंग्रजीवरचे प्रभुत्व तर केवळ थक्क करणारे आहे. विचारांची प्रखरताही तशीच कायम आहे. त्या विचारांना पुन्हा शब्दांत बांधून वाचकांपुढे ठेवण्याची त्यांची प्रचंड इच्छा आहे. परंतु माझ्यासारख्या अशा औलियाला कोण नोकरी देणार, असा त्यांचा सवाल आहे. आज अनेक मोठय़ा दैनिकांचे सारथ्य करणारे ज्येष्ठ पत्रकार संपादक दासगुप्ता यांचे सहकारी राहिले आहेत. परंतु कधीही दासगुप्तांनी या संबंधांना पोटच्या भुकेवर मात करण्यासाठी वापरले नाही. कधी रामदास पेठ, कधी शंकरनगर तर कधी बर्डी मेनरोडच्या कडेला ते हमखास आढळतील. ध्येयवादी पत्रकारितेचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर या क्षेत्रात नव्याने येणार्‍यांनी एकदा तरी या माणसाला एकट्यात गाठायलाच हवे. कारण माध्यमांच्या झगमगणार्‍या विश्‍वात उद्या अशी पत्रकारिता कोळून पिलेली माणसं भेटतीलच याची काय शास्वती?


दैनिक लोकमत,नागपूर 

..........................................................................

नागपुरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांची दुर्देवी कहाणी वाचल्यानंतर अनेकांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.रविंद्र दासगुप्ता यांना जे आर्थिक मदत करतील,त्यांची नावे बेरक्या ब्लॉग आणि बेरक्या फेसबुक वॉलवर प्रसिध्द केली जातील.यात कोणताही मोठेपणा नसून,व्यवहार पारदर्शक राहण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.दररोज मदत करणाऱ्यांचे नाव आणि रक्कम प्रसिध्द केली जाईल,नंतर एकूण जमा रक्कम घोषित केली जाईल.
.......................................................................................................

नागपुरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांना ज्यांना मदत करायची आहे,त्यांनी सुरेश चरदे,पत्रकार,लोकशाही वार्ता ( Mobile .9595529080 ) यांच्याशी संपर्क साधावा तसेच त्यांचे बँक अकौाट नंबर खालील प्रमाणे आहे

*सुरेश चरदे,
बँक आॅफ इंडिया - खाते क्र.870810110003217 आणि
अ‍ॅक्सिस बँक खाते क्र. 13010021242612
- यात आपण मदतनिधी जमा करू शकता.
- चरदे यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केल्यानंतर बँक स्लीपची झेराक्स प्रत बेरक्याला ई - मेल करावी,ही विनंती.
berkya2011@gmail.com