निखिल वागळे यांच्या विरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

‘आयबीएन लोकमत’चे संपादक निखिल वागळे आणि त्यांच्या वृत्तवाहिनीविरोधात नितेश राणे यांनी शुक्रवारी ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. 
मुंबई- उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुंडगिरीचा आरोप करून त्यांच्या मुलांचा म्हणजेच ‘स्वाभिमान’चे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे आणि खासदार डॉ. निलेश राणे यांचा उल्लेख ‘गुंडाची दुसरी पिढी’म्हणून करणारे ‘आयबीएन लोकमत’चे संपादक निखिल वागळे आणि त्यांच्या वृत्तवाहिनीविरोधात नितेश राणे यांनी शुक्रवारी ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. वांद्रे न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला होणार आहे.
आयबीएन वृत्तवाहिनीवर पाच डिसेंबर २०१३ रोजी ‘आजचा सवाल’ या कार्यक्रमात निखिल वागळे यांनी संपूर्ण राणे कुटुंबीयांवर गुंडगिरीचा आरोप करतानाच नितेश राणे यांच्या गुंडगिरीकडे पोलिस कानाडोळा करत असल्याचे म्हटले होते. या कार्यक्रमात शिवसेनेचे वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, सतीश कामत, निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील, गोपाळ तिवारी आदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात निखिल वागळे यांनी ‘महाराष्ट्र पोलिस झोपलेले आहेत. काँग्रेसमध्ये राणे यांच्यासारखे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत’. ‘पैशात माजलेली ही मुले आहेत, हा पैसा बापाने कमावलेला नाही. कुठून आणला हा पैसा.’‘हे काय गुंडाराज आहे काय. संपूर्ण राणे कुटुंबाला गुंड म्हणावे काय?’, असा सवाल करत या कुटुंबावर १०० पेक्षाही अधिक गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला होता.
आयबीएन लोकमतवरील या कार्यक्रमाची चित्रफीत ‘युटय़ूब’वरही टाकण्यात आली असून या माध्यमातून नारायण राणे, नितेश राणे, खासदार डॉ. निलेश राणे यांची प्रतिमा मलिन करण्याचे कुटिर कारस्थान निखिल वागळे आणि त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सुरू आहे. केवळ राजकीय सुडबुद्धीतूनच हा टॉक-शो घडवून आणला होता. त्यामुळेच वागळे यांनी केलेल्या बदनामीच्याविरोधात नितेश राणे यांनी केलेली याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील ‘एमझेडएम’ लीगलचे अ‍ॅड. दिनेश कदम यांनी दिली आहे.
http://prahaar.in/mahamumbai/180252