नाशिकमध्ये 'निर्भिड जनमत'ला हवाय संपादक!

नाशिकमध्ये सध्या नव्या वृत्तपत्रांचे वारे वाहत आहेत. सर्वाधिक उत्सुकता "पुढारी" यावेळी तरी खरोखरच नाशकात येणार का ही असतानाच 'लोकमत' व 'दिव्य मराठी'मध्ये झळकलेल्या जाहिरातींनी धमाल उडवून दिली. 'लोकमत'मध्ये "निर्भीड जनमत"ची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. हे दैनिक लवकरच सुरू होतेय व शिकावू पत्रकार, फोटोग्राफर, वार्ताहर, उपसंपादक, भाषांतरकार, डीटीपी, आर्टिस्ट, डिझायनर अशा अनेक पोस्ट ते भरत आहेत. याशिवाय नाशिकमधील "सीटू'ची सूत्रे हलविणारा एक बडा कम्युनिस्ट नेताही लवकरच पेपर सुरू करीत आहे. कम्युनिस्ट नेत्याची जाहिरात 'दिव्य मराठी'मध्ये प्रसिद्ध झाली होती. "पुढारी"ने जाहिरात छापली नव्हती; थेट लोकांना बोलाविले. गेल्याच आठवड्यात पुण्याचे संपादक संजय आवटे आणि मालक योगेश जाधव नाशकात येवून मुलाखतीही घेवून गेले. 'पुढारी'चे नाशिकमधील संपादक म्हणून 'गांवकरी'चे कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे 'पुढारी'च्या नाशिक कार्यालयातीलच मंडळी सागत आहे.

नाशिकमधून कर सल्लागार असलेले;  तसेच जमिनी; रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक असलेले परशुराम जाधव हे "निर्भिड जनमत" नावाचे दैनिक सुरू करीत आहेत. याप्रोजेक्टमध्ये नाशिक/सिन्नर; तसेच संगमनेरच्या काही बड्या नेत्यांची; उद्योजकांची गुंतवणूक असल्याचीही चर्चा आहे.  दैनिकाची तयारी चांगली आहे. त्यांनी नवे प्रिंटींग मशीन; शिवाय सीटीपीही खरेदी केले आहे; मोठी गुंतवणूक करताहेत. फक्त निवडणुकीपुरते चालेल; असा काही प्रकार दिसत नाही. पुढे त्यांना विस्तारही करायचाय. पुण्यात 'सकाळ'मध्ये सहस्त्रबुद्धे आणि नंतर नाशिकमध्ये द्वारकानाथ लेले यांचे सहाय्यक राहिलेले बाबा जाधव (संगमनेर) हे या दैनिकात महाव्यवस्थापक आहेत. सध्या संपादकाचा शोध सुरू आहे. इतर विभागातील भरती पूर्ण झाली आहे. एकदा संपादकाची नियुक्ती झाली की, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संपादकीय भरती पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. इच्छुकांनी  महाव्यवस्थापक बाबा जाधव (9604721467) यांच्याशी थेट संपर्क करावा. 12 किंवा 16 पानी रंगीत दैनिक त्यांना सुरू करायचेय. नाव असलेला, दैनिकाचा चेहरा बनू शकेल असा संपादक हवाय.

सध्याचा कार्यालयाचा पत्ता : निर्भिड जनमत, सदनिका क्रमांक १०३, पहिलामजला, साबरमती अपार्टमेंट, एक्स्प्रेस इन हॉटेलच्या अलीकडे, किनारा हॉटेलच्या पुढे, फ्लायओव्हरखाली, पाथर्डी फाटा, नाशिक.
कार्यालयाचा फोन क्रमांक : 7745017117


जळगावातही दैनिकाची धामधूम!
जळगावातही निवडणुकीच्या तोंडावर नव्या दैनिकांची धामधूम सुरू आहे. 'नि:पक्ष, निर्भीड'चे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. सध्या खपात 'पुण्यनगरी'नंतर चौथ्या स्थानी असलेल्या 'इव्हेंटपत्रा'पेक्षाही नव्या दैनिकाची जाहिरात उत्पनाची स्थिती 'दिव्य' आहे. अंकातच दम नाही तर जाहिराती आणणार कुठून, असा सवाल मार्केटिंग विभागाकडून केला जातोय. या विभागाचे राज्य प्रमुख एका 'नाजूक प्रकरणात' गुंतले असून सध्या त्यांचे 'इव्हेंट' जोरात सुरू असल्याचे इंग्रजी ई -मेल्स मुख्यालयातीलच काही मंडळी 'मकबरा'च्या साक्षीने राज्यभर पाठवून 'भडास' काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या 'नि:पक्ष, निर्भीड'ची अशी धास्ती आहे, की त्यांच्या पार्किंगमधून चोरटे मोटारसायकली पळवून नेत आहेत; डिक्कीतून दीड लाख रुपये चोरीला जातायेत! घरकुलाचा पाठपुरावा करून भल्या-भल्यांची दाणादाण उडविलेल्या या  दैनिकाचा पोलिसातला, क्राईममधला दरारा पार संपला आहे. तुम्ही 'पटविले' जावू शकता; हे एकदा का मार्केटने पाणी जोखले की किंमत संपलीच! आता 'इव्हेंटपत्रा'तून एक 'विशाल' सहकारी आणून म्हणे 'क्राईम' पुन्हा तगडे करणार आहेत!

जळगावात 'स्मार्ट मित्र'चीही अवस्था अतिशय दयनीय, शोचनीय आहे! ३५-४० हजारात (हाही दावाच!) पाच महिने काढल्यानंतर आता ३१ जानेवारीला बुकिंग  संपायला आले तरी हजारभर ग्राहकही पुन्हा जुळलेले नाहीत. 'ग्लोबलायझेशन ते लोकलायझेशन'चे स्वप्न दाखविले गेले; पण 'लोकलायझेशन' म्हणजे काही 'लोकल रेल्वे' नाही! मुंबईत 'लोकल'च्या बातम्या विकल्या जातात, वाचल्या जातात. जळगावात मात्र उठसूठ रेल्वेच्या फुटकळ बातम्या नावानिशी आणि पान १ वर पाहून वाचकांना (जे काही आहेत त्यांना!) आता वीट आलाय. हे म्हणजे एखादा बसने ये-जा करणारा गावचा वार्ताहर जसा रोज 'नारोशंकराची घंटा'मध्ये तेच-ते रटाळ बसचे किस्से पाठवायचा तसे अजीर्ण झालेय. (
'नारोशंकराची घंटा' म्हणजे काय हे गझलकार, पत्रकार नाशिकरांना विचारा, त्यांच्या नावात नाशिक जिल्ह्यातील एक तालुकाही आहे!) रेल्वे नाहीतर महापालिका यापलीकडे जळगावचे विश्व कधी 'स्मार्ट'पणे बघणार आहेत की नाही ही मंडळी? त्यात 'उत्तर महाराष्ट्राची खबरबात' घेणारयांना जळगावची खबर घेण्याचा अधिकारही ठेवलेला नसल्याने आनंदीआनंद अजूनच गहिरा झाला आहे. बरे 'महा' म्हणजे मोठे 'बळ' फक्त नावापुरतेच! प्रत्यक्षात सारा 'अर्ध्या हळकुंडात पिवळा' असा लिंबू-टीम्बू पोरांचा खेळ सुरू आहे. 'नाव मोठे लक्षण खोटे' असा हा 'धरले तर चावते आणि सोडले तर पळते' प्रकार झालाय. चार महिने अर्धवेळ मंडळींना मानधन नव्हते; फोटोग्राफरला अजून एक पैशाचे मानधन नाही! एक मुलगी राजीनामा देवून निघून गेलीय. ज्यांना काही कळत नाही ते 'उपरे' स्थानिक राजकारणावर असे गूढ-रम्य लिहितात, की (चुकून संपादक झालेले) 'पुस्तकलिखे' राजकीय/चीप वार्ताहरही त्यापुढे फिके पडावे! लोकांना आता हसण्यातही रस उरलेला नाही. सध्या तरी (काही शेकडा) जळगावकरांची सकाळ 'मनोरंजन टाईम्स'मुळे पार खराब होत आहे! त्यापेक्षा हेमंत पाटील यांचा 'बातमीदार' तरी सरस निघतोय! बोरीबंदरातल्या संपादकांनु, तुम्ही ग्लोबलच बरे आहात हो; ही जागोजागची लोकल 'लोकनाट्य तमाशा मंडळे' बंद करा! ग्रामीण महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी खानविलकरांच्या अमृताची 'एक्स्प्रेस' आणि 'कपिलच्या रात्री' आहेत, त्या पुरे की!

या सर्वात जळगावात या घडीला तरी पुन्हा 'मानबिंदू'चाच मान (आणि शानही!) नंबर एक आहे! अशात आता कॉंग्रेसनेते विवेक ठाकरे हे कृषि एक्स्प्रेस आणि प्रहार एक्स्प्रेस घेवून आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद एडके हे पुन्हा स्वत:चे सायंदैनिक काढण्याच्या तयारीला लागले आहेत. 'माझे जळगाव'ही बाजारात येवू घाताले आहे. या सर्वांना 'बेरक्या'च्या शुभेच्छा!