ज्येष्ठ पत्रकार बासीत मोहसीन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

औरंगाबाद : दररोज कार्यालयातून बाहेर पडताना आमचे बासीतभाई म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार तथा लोकमतचे मुख्य उपसंपादक अब्दुल बासीत मोहसीन (रा. रेल्वेस्टेशन) हे आपल्या दोन-चार सहकार्‍यांची चेष्टा करीत कार्यालयातून 'एक्झिट' घेत असत. आजही त्यांनी अशीच हसत-खेळत कार्यालयातून एक्झिट घेतली आणि थोड्या वेळानंतरच त्यांनी जीवनातून कायमची एक्झिट घेतल्याची दुर्दैवी वार्ता कार्यालयात येऊन धडकली.
दररोज त्यांची एक्झिट कार्यालयातील प्रत्येकाला आनंद देऊन जात असे. आज मात्र त्यांची एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला कायमचीच चटका लावून गेली.
शनिवारी रात्री हृदयविकाराने राहत्या घरी त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ५९ वर्षांचे होते. नित्यनियमाप्रमाणे शनिवारी दिवसभर वार्तांकन करून ते सायंकाळी लोकमत कार्यालयात आले. ड्युटी संपल्यानंतर हसत-खेळत ते कार्यालयातून बाहेर पडले. रात्री घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला व रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. बासीत मोहसीन यांनी १९८0 पासून औरंगाबाद टाईम्स या उर्दू दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. १९८५ मध्ये ते लोकमतमध्ये रुजू झाले. आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत विविध, सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी आदी विषयांवर सडेतोड लिखाण केले. निर्भीड, धडाडीचे व स्पष्ट वक्ते पत्रकार अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी क्राईम, मनपा, रेल्वे, आरटीओ, विमानतळ, राजकीय आदी बीटमध्ये उल्लेखनीय काम केले होते. शोधपत्रकारितेत तर त्यांचा हातखंडा होता. त्यांनी उघडकीस आणलेले विद्यापीठाचे बोगस डिग्री स्कँडल, कंडोम घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले.
या शोधमालिकेसाठी त्यांना जगन फडणवीस शोधपत्रकारिता पुरस्कार मिळाला होता. उर्दू,मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच तेलगू भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. मनमिळाऊ व मिश्कील स्वभाव असणारे बासीत मोहसीन हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. शहरातील मुस्लिम समाजाच्या विकास प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लिखाण केले. 'सिकंदर शास्त्री' या टोपण नावाने ते परिचित होते.
घटनेची माहिती मिळताच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, लोकमत मीडिया प्रा. लिमिटेड सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तथा पत्रकारांनी रुग्णालयात धाव घेतली.
अब्दुल बासीत मोहसीन यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. रविवारी, सायंकाळी असरच्या नमाजनंतर ५ वाजून १५ मिनिटांनी रेल्वेस्टेशन येथील मशिदीमध्ये नमाज-ए-जनाजा पढण्यात येईल. त्यानंतर शाहशोख्ता दर्गा परिसरातील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येईल.