मुंबईतील 'सकाळ'चे पत्रकार तुषार खरात यांना बेदम मारहाणीचा निषेध

माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू व माण पंचायत समितीचे सदस्य शेखर गोरे यांनी 17 एप्रिल रोजी पांढरवाडी ता. माण येथील मतदान केंद्रात घुसून मुंबईतील 'सकाळ'च्या विशेष शोध पथकाचे (SIT) ब्युरो चीफ तुषार खरात यांना बेदम मारहाण केली. या दडपशाहीचा मुंबईसह राज्यातील सर्व पत्रकारांनी निषेध केला आहे. वाळू माफियांची दंडेली हे सरकार कुठवर सहन करणार आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. पांढरवाडी ता. माण येथील बाबूलाल मुलाणी यांच्या पत्नी पांढरवाडी या गावच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी शेखर गोरे यांनी काही दिवसांपासून बाबू मुलाणी यांच्याकडे तगादा लावला होता. बरयाच दिवसांपासून ही धुसफूस चालू होती. 17 एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे सव्वा पाचच्या सुमारास गोरे पन्नास कार्यकर्त्यांसह पांढरवाडी येथील मतदान केंद्रात घुसले. यावेळी मुलाणी मतदान करण्यासाठी केंद्रात गेले होते. गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मुलाणी यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पत्रकार तुषार खरात हे ही मतदान केंद्रावर उपस्थित होते. त्यांनी मध्यस्थी करण्याच्या प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. शेखर गोरे यांनी सुमारे पन्नास जणांचा जमाव मतदान केंद्रात घुसवल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच गोरे यांनी जमावबंदी, दहशत पसरवणे या आदेशाची पायमल्ली केली. तुषार खरात (9821288622) यांना 'बेरक्या'चा पाठिंबा व या भ्याड मारहाणीचा निषेध!