जालना येथील पत्रकार विठ्ठलसिंग राजपूत यांची हत्त्या

जालना येथील साप्ताहिक विश्वप्रतापचे संपादक  विठ्ठलसिंग गुलाबसिंग राजपूत ( वय 35) यांचा काल जुना जालना परिसरातील शनिमंदिर भागात निर्घृण खून करण्यात आला.रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडल्याचं जालना पोलिसानी सांगितलं..विठ्ठलसिंग राजपूत हे मुळचे मंठा तालुक्यातील तळणी येथील रहिवाशी होते.
मारेकरी रात्री  घरात घुसले आणि लाकूड,काठीने मारत सुटले.जीव वाचविण्यासाठी विठ्‌टलसिंह घरातून बाहेर धावत सुटले.पण मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला.घराच्या बाहेरही त्यांना बेदम मारहाण केली गेली.अंतिमतः त्यांना खंजिराने भोसकण्यात आले.त्यात त्यांचे निधन झाले.गवळी मोहल्लयातील जनता हायस्कूल परिसरात त्यांचा मृतदेह पोलिसाना आढळून आला.या प्रकरणी रात्री उशिरा कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. आणखी दोघे फरार आहेत.आरोपीना आज न्यायालयात हजर केले असता आरोपी  सुनील रामेश्वर सोनार,अकबरखान युसूफखान,शेख अन्वर शेख बाबर,यांना न्यायालयाने 6 जून पर्यत पोलिस कोठडी दिली आहे.सर्व आरोपी 19 ते 21 वयोगटातील आहेत.हत्येचं नक्की कारण समजू शकले नाही.
महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला आहे.